काळसे बागवाडी मारहाण व जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन
आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप पई, अंबरीष गावडे, ॲड. विरेश राऊळ व जावेद सय्यद यांचा युक्तिवाद
१८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली होती मारहाणीची घटना
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे फिर्यादी उल्हास नारायण नार्वेकर (४५) यांना हाताच्या थापटाने तसेच जंगली काठीने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपी उदय सुधाकर नार्वेकर (४५) आणि विनोद गोपाळ नार्वेकर (५१, दोन्ही रा. काळसे बागवाडी) यांना मालवण न्यायालयाने ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.
संशयित आरोपी उदय नार्वेकर याच्यातर्फे ॲड. स्वरुप पई व अंबरीष गावडे तर संशयित आरोपी विनोद नार्वेकर याच्यातर्फे ॲड. विरेश राऊळ व जावेद सय्यद यांनी काम पाहिले. ही मारहाणीची घटना १८ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास घडली होती.
या घटनेतील फिर्यादी उल्हास नारायण नार्वेकर यांचा काळसे बागवाडी येथे बाळराजे फायबर आणि बिल्डर्स नावाचा कारखाना असून कारखान्याच्या जागा मालकीवरून फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ अम्रुत नार्वेकर व उदय नार्वेकर यांच्यात वाद आहेत. याबाबत ओरोस जिल्हा न्यायालयात दावा सुरू आहे. सदरचा कारखाना बंद करण्यासाठी आरोपी सातत्याने प्रयत्नशील असतात. १८ एप्रिल रोजी दुपारी ३.४५ वाजता आरोपी हे या कारखान्यात फोटो व शूटिंग करत होते. सदरची बाब कारखान्यातील कामगार श्रीकांत वासुदेव जावकर याने उल्हास नार्वेकर यांना सांगितली असता ते लागलीच कारखान्यात आले व त्यांनी शूटिंग बाबत आरोपींना विचारणा केली असता त्याचा राग येऊन दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास आरोपी उदय नार्वेकर व विनोद नार्वेकर यांनी फिर्यादी उल्हास नार्वेकर यांना हाताच्या थापटाने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सुमारे ६२ हजार रुपये किमतीची सोन्याची रुद्राक्षाची माळ खेचून चोरून नेली. यानंतर फिर्यादी हे त्यांच्या घरी जात असताना ते जुन्या घराजवळ आले असता पुन्हा आरोपी उदय नार्वेकर व विनोद नार्वेकर यांनी त्यांना खाली पाडले व विनोद नार्वेकर यांनी त्यांच्या पाठीवर जंगली काठीने मारहाण करून दुखापत केली. तसेच तुझ्या भावालाही बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत उल्हास नार्वेकर यांनी मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसानी आरोपींना मालवण न्यायालयात हजर केले. यावेळी चोरीला गेलेली सोन्याची चैन जप्त करण्यासाठी अजून ४ दिवस पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र आरोपींच्यावतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला. त्याच्या सुनावणीनंतर मे. मालवण न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला आहे.