रयत वायरी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध ; संचालक मंडळावर भाजपचे वर्चस्व
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरही भाजपचाच झेंडा ; अध्यक्षपदी हरीश गावकर तर उपाध्यक्षपदी संजय लुडबे बिनविरोध
जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्यासह माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची रणनीती कामी
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण येथील वायरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत भाजपने ८ जागा आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळवले असून महाविकास आघाडीला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांवर देखील भाजपने झेंडा फडकवला असून अध्यक्ष पदी हरीश गावकर तर उपाध्यक्ष पदी संजय लुडबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रयत वायरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, वायरी ता. मालवण या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम येथील लायब्ररी शाळेत मंगळवारी निश्चित करण्यात आला होता. मात्र भाजपा आणि महाविकास आघाडीने सामंजस्याने ही निवडणूक बिनविरोध केली आहे. यामध्ये भाजपाकडे ८ जागा तर महाविकास आघाडीकडे ४ जागा राहिल्या आहेत. संचालक मंडळात साईनाथ रामचंद्र चव्हाण, मनोज मंगलदास लुडबे, अरुण दत्ताराम तळगावकर, दिनकर विनायक मसुरकर, जगदीश दिगंबर गावकर, कृष्णा पांडुरंग चव्हाण, हरीश वसंत गावकर, संगीता गोविंद मुंबरकर, प्रणिता प्रमोद लंगोटे, श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, मनोहर नामदेव मालवणकर हे १२ जण बिनविरोध निवडून आले आहेत.
१२ पैकी ८ जागा भाजपाकडे तर ४ जागा महाविकास आघाडीकडे राहिल्या आहेत. यावेळी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपाच्या हरीश गावकर तर उपाध्यक्षपदी भाजपाच्याच संजय लुडबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचे जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्यासह माजी नगरसेवक आप्पा लुडबे, संस्थेचे सचिव योगेश चव्हाण, उदय गावकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, जॉमी ब्रिटो यांच्यासह भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. ही निवडणूक बिनविरोध होऊन भाजपाच्या ताब्यात राहण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्यासह माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी परिश्रम घेतले.