तळगाव बैल झुंजीसाठी पारितोषिक पुरस्कृत करणाऱ्या दोघांना अटक आणि सुटका
संशयित आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद
मालवण : तळगाव येथील अनधिकृत बैल झुंजीसाठी पारितोषिक पुरस्कृत करणाऱ्या सुनील सुभाष मांजरेकर (वय- ४३, मु. पो. सांडवे, ता. देवगड, सध्या रा. घाटकोपर वेस्ट मुंबई) व अनिल सुभाष मांजरेकर (वय- ३७, मु. पो. सांडवे, ता. देवगड सध्या रा. घाटकोपर वेस्ट मुंबई) या दोघा संशयितांना मालवण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना मालवण न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने त्यांची प्रत्येकी साडेसात हजारांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी युक्तिवाद केला.
तळगाव येथील अनधिकृत बैल झुंज दरम्यान जखमी झालेल्या वेंगुर्ले येथील एका बैलाचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. प्राणीमित्र संस्थेच्या माध्यमातून दाखल तक्रारीनंतर मालवण पोलीस ठाण्यात १२ संशयितांवर गुन्हे दाखल झाले. १० संशयितांच्या अटकेची व जामिनाची कार्यवाही १ एप्रिल रोजी पूर्ण झाली होती. या वादग्रस्त बैल झुंज आयोजनातील विजेता चषक ‘कोकण किंग २०२२’ हा मालवण पोलिसांनी जप्त केला आहे.
गुन्हा दाखल असलेल्या १२ मुख्य संशयित पैकी बैल झुंज आयोजनातील पारितोषिक पुरस्कृत करणारे सुनील सुभाष मांजरेकर व अनिल सुभाष मांजरेकर या दोघांना मालवण पोलिसांनी मंगळवारी अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांची प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. अन्य अज्ञात संशयित आरोपी यांचाही शोध सुरू असल्याचे मालवण पोलिसांनी सांगितले.