मालवणात संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ६९ प्रकरणांना मंजुरी
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून ७ व्यक्तींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशाचे वितरण
८ एप्रिल रोजी मालवणात संजय गांधी निराधार योजनेचे विशेष महाशिबीर ; अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ६९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून ७ व्यक्तींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. दरम्यान, संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व कागदपत्रांची पूर्तता करता यावी, यासाठी येत्या ८ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृहात विशेष महाशिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांनी दिली आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीची बैठक तालुका अध्यक्ष मंदार केणी व तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तहसील कार्यालय येथे पार पडली. यावेळी अनुष्का गावकर, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, भाऊ चव्हाण, सुनील पाताडे, विजय रावले, अव्वल कारकून उदय मोंडकर, वृंदा पाटकर आदी समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ६९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजेनेअंतर्गत ७ जणांना प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत देण्यात आली. यामध्ये वृषाली सूर्यकांत कुमठेकर (देवबाग), मयुरी मिलिंद तांडेल (देवबाग) श्रुतिका दत्ताराम केळुसकर ( दांडी), रंजना रमेश जुवेकर (वराड), अस्मिता सुहास तळगावकर (तळगाव), नेहा चंद्रकांत केळुसकर ( तारकर्ली) आणि नतालीन इशेद मेंडीस ( रेवतळे) यांचा समावेश आहे.
८ एप्रिल रोजी संजय गांधी योजनेचे महाशिबीर
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे प्रस्ताव एकाच ठिकाणी प्राप्त व्हावेत, आणि लाभार्थ्यांना कागदपत्रांची अडचण होऊ नये यासाठी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे संजय गांधी निराधार योजनेचे महाशिबीर ८ एप्रिल रोजी लावण्यात आले आहे.याठिकाणी उत्पनाचे दाखले तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे. शासकीय अधिकारी, सेतू सुविधाही त्याच ठिकाणी कार्यरत असणार आहे. लाभार्थ्यांची प्रकरणे पूर्ण करून ती मंजुरीसाठी समितीकडे घेतली जाणार आहेत. लाभार्थ्यांना सोईस्कर पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता एकाच ठिकाणी व्हावी, त्यांना हेलपाटे पडू नयेत. हा या मागील महत्वाचा उद्देश आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी देखील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ करून द्यावा, असे आवाहन समिती अध्यक्ष मंदार केणी यांनी केले आहे. यावेळी जुन्या प्रकरणांसाठी नवीन उत्पन्नाचे दाखले देखील काढून मिळणार आहेत.