माजी महापौर दत्ता दळवी, रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांना अटक !

थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार ; अनधिकृत बैल झुंज प्रकरण भोवले

मालवण : मालवण तालक्यातील तळगाव येथे अनधिकृत पण बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. थोड्याच वेळात त्यांना न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे.

प्युअर अनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या माध्यमातून सुप्रिया मधुकर दळवी (रा. कोळब, मालवण) यांनी गुरुवारी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या सर्वांवर भादवि कलम 429, 34 यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजिक दोन दिवसांपूर्वी बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. यात बैलांचा होत असलेला छळ, बैलांना झालेली दुखापत हे स्पष्टपणे दिसत होते. हजारो लोकांचा जमाव दिसून येत होता. या झुंजीत जखमी झालेल्या एका बैलाचे निधन झाले. त्यांनतर प्राणी मित्र संघटनानी एकत्र येत त्या व्हिडिओ मधील व्यक्तींची खातरजमा केली. आयोजकां बाबत माहिती मिळवली. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेत बैलांची अनधिकृत झुंज लावणे, बैलांना क्रूरतेने व अमानुष वागणूक देऊन एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखपतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी १२ प्रमुख संशयितां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दत्ता दळवी (तळगाव), बाळा पेडणेकर (सुकळवाड), आझीम मुजावर (नेरुर कुडाळ), बाबू ताम्हाणेकर (सुकळवाड), अभि शिरसाट (कुडाळ), आशिष जळवी (कविलकट्टा कुडाळ), सुनील मांजरेकर (नेरुर), अनिल मांजरेकर (नेरुर), रुपेश पावसकर (कविलगाव कुडाळ) विकी उर्फ सनी केरकर (आसोली वेंगुर्ला), जयगणेश ज्ञानदेव पावसकर (कविलगाव नेरुर) व शुभम नारायण कुंभार (कुडाळ कुंभारवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या झुंजीत रुपेश पावसकर यांच्या मालकीच्या बैलाची विकी उर्फ सनी केरकर यांच्या मालकीच्या बैलाशी झुंज झाली. यात विकी केरकर यांचा बैल जखमी होऊन त्याला शिरोडा येथील डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!