वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचं मालवणात अनोखं आंदोलन

मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्र सरकारचा केला निषेध

कुणाल मांजरेकर

मालवण : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने आज (गुरुवारी) मालवणात अनोखं आंदोलन केलं आहे. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने चक्क मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध नोंदवला. शहरातील फोवकांडा पिंपळ येथे हे आंदोलन करण्यात आले.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस कडून महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन करण्यात येत आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे मालवण येथे फोवकांडा पिंपळपार येथे मोटर सायकल व गॅस सिलिंडर रस्त्यावर ठेऊन त्यांना पुष्पहार घालून महागाई मुक्त भारतसप्ताह आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, आप्पा चव्हाण, महेंद्र मांजरेकर, युवक माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, श्रेयस माणगावकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, श्रीहरी खवणेकर, चंदन पांगे, अमृत राऊळ, सरदार ताजर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दर दिवशी गॅस व इंधन दरवाढ कशी होत आहे याचा पाढा मेघनाद धुरी यांनी वाचला. ही वाढ सामान्य जनतेला परवडणारी नाही, महागाई कमी करण्याच्या आश्वासनला भाजप पक्ष जागला नाही अशी टीका बाळू अंधारी यांनी केली. तर अशीच दर वाढ होत राहिल्यास पुन्हा चुली पेटवाव्या लागतील व आम्हाला देखील मातीच्या चुलीचं वाटप करावं लागेल, असे अरविंद मोंडकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!