राणे मुंबईकडे रवाना ; जनआशीर्वाद यात्रेला एका दिवसाचा ब्रेक
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माहिती
रत्नागिरी पोलिसांवर न्यायालयाचे ताशेरे : प्रसाद लाड यांची माहिती
कुणाल मांजरेकर
महाड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा ते कुटुंबीयांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, दिवसभराच्या दगदगीमुळे उद्याचा दिवस राणेसाहेब विश्रांती घेऊन डॉक्टरांकडून काही तपासण्या करून घेतील. आणि गुरुवारपासून पुन्हा एकदा जनआशीर्वाद यात्रा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
दरम्यान, रत्नागिरी पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने राणेसाहेबांना अटक करण्यात आली. याबाबत संगमेश्वर पोलीस निरीक्षक आणि रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकां विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे.
महाड न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा नारायण राणे कुटुंबीयांसमवेत न्यायालयाबाहेर आले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांची कोणतेही भाष्य न करता गाडीत बसून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज दिवसभर राणेसाहेबांना दगदग झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. त्यामुळे उद्याचा दिवस जनआशीर्वाद यात्रा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत नारायण राणे काही वैद्यकीय तपासण्या करून परवापासून पुन्हा एकदा जोमाने जनआशीर्वाद यात्रा सुरू करतील, असे प्रवीण दरेकर म्हणाले. प्रशासनाने कायद्याचा कितीही दुरुपयोग केला असला तरीही न्याय देवतेवर आमचा विश्वास होता. त्यानुसार न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला असून राणेंच्या जामीनाना मुळे राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे ते म्हणाले.
“त्या” पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार !
महाड न्यायालयातील सुनावणीत कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. नारायण राणे यांसारख्या ज्येष्ठ आणि जबाबदार मंत्र्याला अटक करताना कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही. अटक केल्यानंतर साडेतीन तास त्यांना केवळ बसवून ठेवले. त्यांना कोणत्या कारणासाठी अटक केली, याचीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत रत्नागिरी पोलीस अधीक्षक आणि संगमेश्वर पोलीस निरीक्षकांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई साठी कोर्टात जाणार असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. राणेसाहेबांवर सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली आहे. त्यामुळे परवा पासून सुरु होणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेत संपूर्ण जनता उस्फुर्त सहभाग घेईल आणि ठिकठिकाणी राणे साहेबांचे जल्लोषी स्वागत होईल असेही ते म्हणाले.