305
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने राज्यातील ठाकरे सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा जामीनही मंजूर करण्यात आला. मंगळवारचा पूर्ण दिवस नारायण राणे आणि त्यांच्या अटकेवरून गाजला असतांना या संपूर्ण घडामोडीत गप्प असलेल्या शिवसेना प्रवक्ते तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर प्रहार केला आहे. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशी पाच दूषणे देत राणेंवर सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आता नारायण राणे याचा कसा समाचार घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.
नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोक वाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ”मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,” असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल. मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे हे अती सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री आहेत.
पंतप्रधान स्वतःला अत्यंत ‘नॉर्मल’ माणूस म्हणवून घेतात. ते स्वतःला फकीर किंवा प्रधानसेवक म्हणवून घेतात, हा त्यांचा विनम्र भाव आहे, पण राणे म्हणतात, ‘मी नॉर्मल नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा केला तरी मी कायद्याच्या वर आहे.’ राणे व संस्कार यांचा संबंध कधीच नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाची झूल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा केल्याने महाराष्ट्राच्या संयमाचा बांध तुटला आहे. या किरकोळ व्यक्तीस शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले, सर्वोच्च पदे दिली, पण नंतर हे महाशय शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. शिवसेना सोडून 20 वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरुच आहे. या काळात त्यांनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱ्यांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे ‘इनाम’ म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरु ठेवले आहेत.
नको त्या माणसाला सत्तेची दारु पाजली. शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या वल्गना हवेत विरत असताना कणकवलीच्या चारीमुंड्या चीत पुढाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा केली. हा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाचे या बेताल वक्तव्यांवर नेमके काय म्हणणे आहे? नको त्या माणसाला सत्तेची दारु पाजल्याने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्याचा अनुभव भाजप सध्या घेत आहे. ‘केले तुका आणि झाले माका’ असेच त्यांचे दशावतार यानिमित्ताने झाले आहेत.
राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली, त्यामुळे केंद्रीय सरकारची मान शरमेने खाली झुकली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. राणे यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांचे विधान मोदी-शहांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजे, असे सामना मधून म्हटले आहे. त्यामुळे सामना मधील टीकेचा नारायण राणे कसा समाचार घेणार ? याबाबत उत्सुकता आहे.