विरण सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अटीतटीच्या निवडणूकीत भाजपची बाजी !

बाबा परबांच्या नेतृत्वाखाली विजय : अध्यक्षपदी रामदास पांजरी तर उपाध्यक्षपदी पंकज परब

मालवण : मालवण तालुक्यातील विरण वि.का.स. सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने बाजी मारली आहे. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी रामदास पांजरी यांची तर उपाध्यक्ष पदी पंकज परब यांची निवड झाली आहे.

या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ संचालक मंडळ सदस्यापैकी भाजप प्रणित शेतकरी समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी होऊन सोसायटीवर भाजपची सत्ता स्थापन झाली. तर शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी झाले होते. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित उमेदवार रामदास पांजरी यांनी अध्यक्ष पदासाठी तर पंकज परब यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीतर्फे राजाराम उर्फ नाना नेरुरकर यांनी अध्यक्षपदासाठी तर जयेश नार्वेकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडीसाठी गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक होऊन अध्यक्ष पदाच्या निवडीत रामदास पांजरी यांना ७ तर राजाराम नेरुरकर यांना ६ मते मिळाल्याने पांजरी हे विजयी झाले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी पंकज परब यांना ७ मते तर जयेश नार्वेकर यांना ६ मते मिळाल्याने परब हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्ण मयेकर यांनी तर सहाय्यक म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे जिल्हा बँक संचालक बाबा परब, जि.प. चे माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, दादा नाईक, सुभाष परब, अनंत भोगले, रवीचंद्र घाडीगांवकर, जितेंद्र परब, विलास पांजरी, दत्ताराम आंबेरकर, दिलीप कांदळगावकर तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजप प्रणित पॅनेलचे जागृती परब, रघुनाथ परब, विश्वनाथ परब, अनिल जाधव, रामचंद्र झोरे तर शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे राजाराम नेरुरकर, सुरेश नेरुरकर, भाऊ परब, निर्मला परब, जयेश नार्वेकर, मोहन घाडीगांवकर आदी संचालक व इतर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!