मालवणात परप्रांतीय व्यापाऱ्यावरून स्थानिक व्यावसायिकांमध्ये “बाचाबाची”
पर्यटन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप ; बाळू अंधारी यांनी उपस्थित केला “हा” सवाल
उद्या रविवारी ११ वाजता होणार बैठक ; उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण बाजारपेठेतील एका परप्रांतीय नॉव्हेल्टी व्यावसायिकाचा ११ महिन्याचा भाडेकरार संपल्याचे सांगत पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय व्यावसायिकाला दुकान खाली करण्याची सक्त सूचना केली. याला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर पर्यटन महासंघाचे पदाधिकारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रश्नी उद्या रविवारी सकाळी ११ वाजता मारुती मंदिरात बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, बाजारपेठेत फार पूर्वीपासून परप्रांतीय व्यापारी दुकाने थाटून आहेत. त्यामुळे फक्त एका व्यापाऱ्यालाच विरोध का ? असा सवाल उद्योजक बाळू अंधारी यांनी उपस्थित केला आहे. एका व्यवसायिकावर जबरदस्ती करण्यापूर्वी शहरातील अन्य परप्रांतीय व्यापाऱ्यांना बाहेर काढावे तसेच पर्यटन महासंघाचे पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्या बाबा मोंडकर, अवि सामंत यांची हॉटेल आहेत. त्यांच्या हॉटेल मध्ये काम करणाऱ्या नेपाळी आणि परप्रांतीय कामगारांना तात्काळ काढून टाकून त्यांनी स्थानिकांना रोजगार द्यावा, असे आव्हान बाळू अंधारी यांनी दिले आहे.
मालवण बाजारपेठेत मागील काही काळापासून एका परप्रांतीय नोव्हेल्टी व्यावसायिकाने दुकान थाटले आहे. या व्यावसायिकाचा अकरा महिन्यांचा करार संपला आहे. तसेच सदरील व्यावसायिकाचा भाऊ बाजारपेठेतील आणखी एका दुकानांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करत असल्याचे सांगून या व्यावसायिकाने आपले अस्तित्वात असलेले दुकान तात्काळ खाली करावे तसेच शहरात नवीन दुकान सुरू करू नये अशी मागणी करत पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी हनुमान मंदिर येथे बैठक घेतली. या बैठकीत संबंधित परप्रांतीय व्यावसायिकाला बोलावून घेण्यात आले होते. मात्र या ठिकाणी बाजारपेठेतील अन्य काही व्यापाऱ्यांनी येऊन या प्रकाराला आक्षेप घेतला. बाजारपेठेत येऊन कोणाचीही मनमानी चालणार नाही, असा इशारा देत कोणीही सांगत असेल म्हणून दुकान बंद करू देणार नाही, अशी भूमिका स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतली. यावेळी पर्यटन व्यवसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, अवी सामंत, शेखर गाड यांच्याशी स्थानिक व्यापारी बाळू अंधारी, रणजीत पारकर, राजेश पारकर यांची बाचाबाची झाली. अखेर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्याशी चर्चा करून या विषयावर उद्या रविवारी सकाळी ११ वाजता बाजारपेठेतील मारुती मंदिरात बैठक घेणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले.
बाबा मोंडकर, अवि सामंत यांनी चमकोगिरी बंद करावी : बाळू अंधारी
उद्योजक बाळू अंधारी यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुळात मालवण व्यापारी संघ आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी आहेत. पर्यटन महासंघाचा व्यापारी महासंघाशी कोणताही संबंध नाही. तसेच व्यापाऱ्यांच्या अंतर्गत प्रश्नावर ढवळाढवळ करण्याचा देखील यांना कोणताही अधिकार नाही. मालवण शहरात फार पूर्वीपासून परप्रांतीय व्यापारी व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. यातील अनेकजण स्थानिकांशी सलोख्याचे संबंध ठेवून आपापले व्यवसाय करत आहेत. त्यामुळे केवळ एखाद्या विशिष्ट परप्रांतीय व्यापाऱ्याला टार्गेट करणे अत्यंत चुकीचे असल्याचे बाळू अंधारी यांनी म्हटले आहे. पर्यटन महासंघाचे पदाधिकारी बाबा मोंडकर आणि अवी सामंत यांची हॉटेल असून त्यांच्या हॉटेलमध्ये नेपाळी आणि अन्य परप्रांतीय कामगार कामास आहेत. इतरांना उपदेश देण्या अगोदर या दोघांनीही आपल्या हॉटेलातील परप्रांतीय कामगारांना काढून टाकून त्या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार मिळवून द्यावा. अवी सामंत हे देवबागचे रहिवासी आहेत. देवबागमध्ये एका हॉटेलचे व्यवस्थापन कोलकत्ता येथील व्यावसायिकाकडून चालवले जाते. त्यामुळे मालवण शहरात येऊन लोकांना उपदेश करण्यापेक्षा अवि सामंत यांनी स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे तो पाहावा. मालवण शहरात कोणी दुकान घालावे आणि कोणी घालू नये हे पाहण्यासाठी प्रशासन तसेच स्थानिक व्यापारी व व्यापारी महासंघ सक्षम आहे. व्यापारी महासंघाला त्याबाबत आक्षेप असल्यास व्यापारी महासंघ आपली भूमिका मांडेल. मात्र बाहेरून कोणीही येऊन यामध्ये हस्तक्षेप करू नये. बाबा मोंडकर, अवी सामंत यांच्यात हिंमत असेल, तर मालवण शहरात अगोदरपासून स्थायिक असलेल्या परप्रांतीय व्यवसायिकांना अगोदर बाहेर काढावे. त्यानंतर या विषयावर चर्चा करावी. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्टंटबाजी करू नये. आज व्यापारी संघाकडे चर्चेची मागणी करणाऱ्या याच मंडळींनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्याला दुकाने बंद ठेवण्याच्या व्यापारी महासंघाच्या निर्णयाला जाहीर आक्षेप घेऊन व्यापाऱ्यांची एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण करून देतानाच आज अनेक व्यवसायात परप्रांतीय आहेत. रस्त्यावर हातगाडी लावून वाहतुकीला अडथळा आणणारे परप्रांतीय आहेत. त्यांना अभय का ? सोमवारच्या आठवडा बाजारात परप्रांतीय येऊन आपली दुकाने थाटतात. मालवण शहराच्या काही सभागृहांमध्ये परप्रांतीयांकडून येऊन “सेल” लावला जातो. त्यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत नाही का ? अशावेळी आज स्थानिकांचा पुळका घेऊन भांडण्यासाठी आलेले पर्यटन महासंघाचे पदाधिकारी कुठे असतात ? असा प्रश्न बाळू अंधारी यांनी उपस्थित केला आहे.