वागदेतील उद्योजकाची इर्टीगाकार फोंडाघाटात जळून खाक ; गाडीत जळलेल्या अवस्थेत एकाचा मृत्यू
उद्योजक निलेश काणेकर यांचा मोबाईल “नॉट रिचेबल” ; मित्रपरिवाराची घटनास्थळी धाव
कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे येथील उद्योजक निलेश काणेकर यांच्या इर्टिका कारला फोंडाघाटात भीषण आग लागून ही कार जळून खाक झाली आहे. या कारमध्ये एकाचा जळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, कारमालक निलेश काणेकर यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्याने मित्रपरिवारात घबराट पसरली आहे. या घटनेनंतर पोलिसांसह त्यांच्या मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली आहे.
फोंडाघाटात नजीक एका इर्टिका कारला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी ५ वाजता घडली. (एमएच ०७ – एजी ६२९७) ही कार आरटीओ दप्तरी निलेश विवेकानंद काणेकर यांच्या नावे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. कणकवली वागदे येथील एन. के. डेकोरेशनचे ते मालक आहेत. पोलीस व वागदे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भीषण आगीत एका इसमाचा सांगाडा जळलेल्या स्थितीत गाडीत आढळून आला आहे. मात्र, तो कोणाचा याची चौकशी सुरू आहे, दरम्यान गाडीचे मालक निलेश काणेकर याचा मोबाईल बंद येत असल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे कारमधील जळालेली व्यक्ती कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचून तपास करीत आहे. या कार मधून काणेकर यांना राधानगरी येथे जातांना काही लोकांनी पाहिले होते. ते एकटेच गाडी चालवत जात होते अशी माहिती मिळत आहे. तर पोलीस घटनास्थळी पंचनामा करून जळलेला मृतदेह डीएनए तपासणीसाठी पाठविणार आहेत. काणेकर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक श्री. देठे, मंगेश बावधने व पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. तसेच वागदेचे माजी सरपंच संदीप रमाकांत सावंत, नगरसेवक अण्णा कोदे, समीर प्रभुगावकर, कणकवली सभापती मनोज रावराणे, फोंडा सरपंच संतोष आंग्रे, नगरसेवक संजय कामतेकर, गौरव मुंज, वैभव काणेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, मधुकर सावंत यांच्यासह यांच्यासह कणकवली, वागदे गावातील व फोंडाघाट ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहेत.