शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला ?
मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये निर्माण झालेला वाद क्षमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. शिवसैनिकांनी राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मालवण तालुक्यातील तळगाव येथील निवासस्थानी अज्ञातांकडून सोड्याच्या बाटल्या आणि दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे समजते. खासदार विनायक राऊत यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे. चार ते पाच व्यक्ती दुचाकीने येथे आल्या होत्या. मात्र दगडफेक करून हे सर्वजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या अज्ञात व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याचे समजते. या घटनेची माहिती दिल्ली येथे विनायक राऊत यांना देण्यात आली आहे.