अंगणवाडी सेविका व मदतनीसच पुढील पिढी घडवतात

महिला दिन कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) : अंगणवाडी सेविका व मदतनिस या मुलांना घडवण्याचे म्हणजेच समाजाची पुढील पिढी घडवण्याचे काम करत असतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त येथील नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कारांचा वितरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, महिला बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उत्कृष्ट काम केल्याचे सांगून श्रीमती सावंत म्हणाल्या, विचारांची देवाण घेवाण करण्यासाठीच आजचा हा महिला दिन साजरा केला जातो. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातूनच समाजामध्ये नवीन विचारांची सुरुवात होत असते. मुलांना घडवण्याच्या त्यांच्या कामतूनच देशात चांगले नागरिक तयार होत असतात. पुरुषांनी महिलांकडे पाहताना एक जबाबदारी म्हणून पहावे हा विचार समाजामध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मुलींकडे पाहताना बहिण म्हणून पहा असे ही श्रीमती सावंत यावेळी म्हणाल्या.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, वर्षातील सर्वच दिवस स्त्रियांचे असावेत. महिलांसाठीचे कार्य वर्षभर सुरू रहावे. सामाजिक बदल कसा घडवता येईल हे पहावे. हे बदल कुटुंबातून घडवता येतील. घर आणि नोकरी सांभाळत असताना महिलांनी स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी काही वेळ दिला पाहिजे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सिंधुकन्या या अभियानाची सुरुवात करताना या अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी सिंधुकन्या अभियानाची माहिती दिली. तसेच या अभियानांतर्गत मासिकपाळी व्यवस्थापन, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, पीसीपीएनडीटी या विषयांवरील पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत लाभार्थ्यांना बचत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

चिमुकलीने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

यावेळी माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभार्थी असलेल्या सोमय अमय खांदारे यांची कन्या नुपुर खांदारे या चिमुकलीने बेटी बचाव बेटी पढाव ही कविता सादर केली. तसेच महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना महिलांना स्वसन्मानाचा संदेशही दिला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!