वृद्ध दशावतारी, भजनी कलाकारांच्या “हक्कांसाठी” आ. वैभव नाईकांचा अधिवेशनात पुढाकार !

कोरोना काळात जाहीर केलेल्या अनुदानापासून दशावतारी मंडळे, कलाकार वंचित

मार्च महिना आला तरी अनुदान नाही ; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? वैभव नाईकांचा सवाल

कुणाल मांजरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्ध दशावतारी कलाकार, भजनी कलाकारांसाठी शिवसेनेचे कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक पावित्रा घेतला. वृद्ध कलाकारांच्या पेन्शन बरोबरच कोरोना काळात सरकारने जाहीर केलेल्या अनुदाना पासून मार्च महिना उजाडला तरी दशावतार मंडळे आणि कलाकार वंचित आहेत. त्यामुळे याला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? असा सवालही आ. नाईक यांनी उपस्थित केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्ध दशावतारी कलाकार, भजनी कलाकारांची संख्या मोठी आहे. जिल्हास्तरावर वृद्ध कलाकारांच्या पेन्शन संदर्भात बैठक होते. त्यात हजारो प्रस्ताव दाखल झालेले असतात. त्यातील केवळ १०० प्रस्तावांना मान्यता दिली जाते. त्यामुळे अनेक पात्र कलाकार या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वेगळी योजना आखून मान्यता दिल्या जाणाऱ्या प्रस्तावांची संख्या वाढवावी, ज्यामुळे जास्तीत जास्त वृद्ध दशावतारी, भजनी कलाकारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. त्याबाबतची कार्यवाही केली जाईल का ? अशा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात उपस्थित केला. त्याचबरोबर कोरोना काळासाठी कलाकारांना अनुदानाची योजना डिसेंबर मध्ये जाहीर करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या दिरंगाई मुळे मार्च महिना आला तरी एकाही कलाकाराला अनुदान मिळाले नाही. दशावतारी मंडळे यांना देखील अनुदान जाहीर केले. मात्र ते देखील मिळाले नाही. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? याबाबतही आमदार वैभव नाईक यांनी विचारणा केली. त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या योजनेत सुधारणा करण्यात येणार असून आ. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा अंतर्भाव योजनेत केला जाईल अशी ग्वाही दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!