किशोरवयीन वयोगटातील मुलीनी आपल्या शारीरीक जडणघडणीकडे बारकाईने लक्ष द्यावे
डॉ. सौ. शुभांगी जोशी यांचे प्रतिपादन ; भंडारी हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
मालवण : स्वातंत्र्यपूर्व काळात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांमध्ये शिक्षण आणि समाज सुधारणेचा पाया घालून देण्यात सावित्रीबाई फुले आणि इतर महनीय महिलांनी जे काम केले त्या कामामुळेच आज सर्व क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. आयुष्यात मोठं व्हायच असेल, काहीतरी कमवायचे असेल तर आपल्यातील शाररिक जडणघडण ही महत्त्वाची आहे. किशोरवयीन वयोगटातील प्रत्येक मुलीने आपल्या शारीरीक जडणघडणीकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मालवणच्या डॉ. शुभांगी जोशी यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास मुलींसाठी किशोरवयीन काळात मुलींनी आरोग्याची घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ. शुभांगी जोशी यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. डॉ जोशी यांनी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उदघाटन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक व्ही. जी. खोत यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक एच. बी. तिवले, सहाय्यक शिक्षिका पी. जी. मेस्त्री, सौ. सरोज बांदेकर, सौ. अस्मिता वाईरकर, सुनंदा वराडकर, सौ. संजना सारंग, श्रीमती. अनिता चव्हाण, श्रीमती वैभवी वाक्कर, सौ.अदिती शेर्लेकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी सौ. मेस्त्री मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तर सौ. बांदेकर मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. जोशी यांनी भारतात पुरुषांच्या तुलनेत मुलींची संख्या वाढत आहे ही समाधानाची तितकीच आनंदाची बाब आहे. किशोरवयीन वयोगटातील मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या वयातच शारीरिक वाढ ही होत असते या वाढीकडे संकुचित वृत्तीने किंवा लज्जित मनाने न पाहता नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे असे सांगून डॉ. जोशी यांनी मुलींच्या शारीरिक जडणघडणी विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी श्री. खोत सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत उपस्थित विद्यार्थीनीना महिला दिनाचे महत्त्व विशद केले. शेवटी सौ. अस्मिता वाईरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मनाली नेरकर हिने केले.