तिजोरीत निधीचा खडखडाट ; पण विकास कामांची भूमिपूजने जोमात !
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
कुडाळ शहर नळपाणी योजेनेच्या ५० कोटींच्या “त्या” पत्रावरूनही घेतला समाचार
कणकवली : मार्च अखेरच्या काळात विविध विकासकामांच्या जाहिरात येत आहेत. किरकोळ दुरुस्ती, रस्त्यांच्या कामाच्या टेंडर जाहिरात येत असून मार्च अखेर कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात विकासकामे होण्यासाठी शासनाकडे निधीच नसताना केवळ भूमिपूजन करण्याचा सपाटा सुरू आहे, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहर नळपाणी योजेनेसाठी नगरविकासमंत्र्यांकडे ५० कोटींची मागणी केली आहे. या पत्रावरून उपरकरांनी समाचार घेतला आहे. वायरी- तारकर्ली- देवबाग मधील नळपाणी योजनेसाठी अशीच मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्या योजनेचे पुढे काय झाले ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे.
कणकवली मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील दर्जेदार रस्त्यासाठी जनतेने संघर्ष केला. संबंधित अधिकाऱ्यांनी डाम्बर कमी वापरल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जनतेने आपल्या भागातील कामे दर्जेदार होण्यासाठी सजग राहावे. निविदा काढल्यानंतर सर्व कामे पूर्ण होतील याची शाश्वती नाही. मागील वर्षी दोडामार्ग तालुक्यातील १० कोटींच्या कामावरून संघर्ष झाला होता. त्यावेळी स्थानिक आमदारांनी नवीन निविदा काढण्याचे जाहीर केले. मात्र अद्याप ती कामे झाली नाहीत. सध्या लोकप्रतिनिधी फक्त भूमिपूजन करताहेत. मात्र प्रत्यक्षात कामे होत नाहीत. कुडाळ मध्ये ५० कोटींच्या नळयोजनेबाबत घोषणा केली. मात्र आमदार नाईक यांनी घोषणा केलेली मालवण पासून तारकर्ली, देवबाग वायरीची नळयोजना अद्याप सुरू झाली नाही. शासनाकडे निधी नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी विकासकामांच्या केवळ सवंग घोषणा करून जनतेला फसवत आहेत. याचा जाब जनतेनेच लोकप्रतिनिधींना विचारावा, असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले.