युक्रेनमध्ये अडकलेली वैभववाडीतील काळे भावंडे स्वगृही परतली

शिक्षण खंडित न होण्याची जबाबदारी घेण्याची केंद्र शासनाला केली विनंती

भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझीनी दोघांचीही केली विचारपूस

वैभववाडी : वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेली कु. दिपराज पांडुरंग काळे आणि कु. आसावरी पांडुरंग काळे हे भाऊ – बहीण शुक्रवारी सकाळी कोकिसरे येथे आपल्या घरी सुखरूप पोहचली आहेत. वैभववाडीचे भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दोन्ही मुलांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत आदी उपस्थित होते.

आम्हाला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचे आहे. आमचे शिक्षण खंडित होणार नाही, याची जबाबदारी केंद्र शासनाने घ्यावी, अशी विनंती दोघा भावंडांनी श्री. काझी यांच्याकडे केली.

युद्धाने पेटलेल्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियातून भारतात आणण्यासाठी शासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वैभववाडी तालुक्यातील शिक्षक पांडुरंग जानू काळे यांची कन्या आसावरी काळे व मुलगा दिपराज काळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकत होते. बुकोव्हीनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी चेन्नसी या ठिकाणी दोघेही (एमबीबीएस) वैद्यकीय शिक्षण घेत होते. दोघेही पहिल्या वर्षात शिकत होते. रशिया व युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू झाल्याने भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक नागरिकाला रोमानिया या देशात यावे लागत होते. कुमारी आसावरी ही रोमानिया देशात दाखल झाल्यानंतर विमानाने दिल्लीत पोहचली. तर दोन दिवसानंतर मुलगा दिपराज हा मुंबईत पोहोचला. दोन्ही मुले ही चुलते रामचंद्र काळे यांच्या चेंबूर येथील घरी बुधवारी पोहचली. मुंबईहून रेल्वेने दोघेही आज सकाळी वैभववाडीत आपल्या घरी पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने खूप मदत केली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास उपलब्ध करून दिला. त्याबद्दल शासनाचे पांडुरंग काळे यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!