ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्काराने सन्मानित
पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते मालवणच्या सुपुत्राचा सन्मान
मालवण : किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने २०२२ चा महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्कार मालवण तालुक्यातील क्रियाशील युवक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर याला प्राप्त झाला आहे. सह्याद्री राष्ट्रीय गड – किल्ले साहित्य कला संमेलनामध्ये पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानकरी पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना तळागाळातील बरेच मान्यवर फक्त कार्य करतात. त्यांना कोणत्याही पुरस्काराची आवश्यकता नसते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यानुसार सतत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता नि:स्वार्थ वृत्तीने कार्य करीत राहणे म्हणजे जीवनाचा खरा अर्थ असतो. अशाच विचारातून किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात वेगळ्या वाटेने चालणाऱ्या कार्याविरांचा सन्मान व्हावा आणि त्यांचे कार्य सह्याद्रीप्रमाणे मोठे व्हावे या उद्देशाने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी मालवण येथील ऐश्वर्य मांजरेकर याची निवड करण्यात आली आहे. ऐश्वर्य याला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. तो स्वतःच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असतो. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत, तरुण व वृध्द व्यक्तींना व्यसन मुक्तीसाठी वैयक्तिक पातळीवर जनजागृती मोहीम राबविणे, आत्मनिर्भर भारत अंतर्गत युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, जलजागरण अभियांनामार्फत महाविद्यालयामध्ये पाण्याचे महत्व समजण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन, विविध राष्ट्रीय दिवस महाविद्यालयामध्ये साजरे करून विद्यार्थ्यांना वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, निबंध अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, कोरोना काळात विविध प्रकारची सामाजिक कार्ये व वृध्दांसाठी वैयक्तिक पातळीवर मोफत रिक्षा सेवा, चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीमध्ये सहभाग, ग्रामीण भागातील वृध्द व्यक्तींसाठी वैयक्तिक पातळीवर साक्षरता मोहीम व जनजागृती, निराधार व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांना सहकार्य करणे, गड – किल्ले संवर्धनासाठी व्यापक स्तरावर जनजागृती, वृक्ष लागवड व बंधारे बांधण्यात सक्रिय सहभाग, विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी शिक्षणमहर्षी प्रि. आर. एल. तांबे, बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे (अध्यक्ष – पुरस्कार निवड समिती ), जेष्ठ उद्योजक प्रकाश गायकवाड ( रायगड ), सुधीर जाधव (उद्योजक, कणकवली) , संतोष कदम (उद्योजक सिंधुदुर्ग) प्रा. बी. एन. खरात अध्यक्ष किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग आदी उपस्थित होते.