कुणकेश्वर यात्रेसाठी मालवण एसटी आगारातून दर तासांनी सुटणार बसफेऱ्या
पहाटे ५ वा. पासून बसेस सुरू : आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती : भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची वार्षिक यात्रा महाशिवरात्री निमित्त संपन्न होत आहे. या यात्रेसाठी मालवण एसटी आगार सज्ज झाले आहे. मालवण आगारातून पहाटे ५ वाजल्यापासून बसफेऱ्या सुरू होणार असून दर तासांनी आगारातून एसटी बस उपलब्ध होणार असल्याची माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.
महाशिवरात्री निमित्त कुणकेश्वरची यात्रा मंगळवारी १ मार्च पासून सुरू होत आहे. या यात्रेनिमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मालवण एसटी आगार सज्ज झाले आहे. पहाटे ५ वाजल्या पासून मालवण बस स्थानकातून एसटी बस उपलब्ध होणार आहेत. मालवण आगाराच्या बसेस कुणकेश्वर मध्ये कातवण पर्यंत प्रवाशांना सेवा देणार आहेत. तरी प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.