मालवण- कुणकेश्वर मार्गावर उद्यापासून दोन दिवस मोफत बससेवा
भाजप नेते, माजी खा. निलेश राणेंचा पुढाकार ; भाविकांतून समाधान
कुणाल मांजरेकर
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची यात्रा उद्या महाशिवरात्री निमित्ताने होत आहे. मात्र एसटीच्या संपामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मालवण ते कुणकेश्वर आणि कुणकेश्वर ते मालवण मार्गावर निलेश राणे यांच्या माध्यमातून उद्या (मंगळवारी) आणि परवा (बुधवारी) मोफत एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून लांबलेल्या संपामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. मागील आठवड्यात आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा संपन्न झाली. या यात्रेत पुरेशा बसेस न सोडल्याने भाविकांची गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या कुणकेश्वर यात्रेत भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. श्री. राणेंच्या माध्यमातून १ आणि २ मार्च रोजी मालवण आणि कुणकेश्वर बसस्थानकातून सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांसाठी मोफत बसेस सोडल्या जाणार आहेत. तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण तालुका आणि शहर भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.