मालवण एसटी आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा
मालवण : मालवण एसटी आगारात रविवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आगार लेखापाल उदय खरात, वाहतूक नियंत्रक अमोल कामते, बाळा मालंडकर, वरिष्ठ लिपिक विनोद शंकरदास, पत्रकार अमित खोत आदी उपस्थित होते. मराठी पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा बजावणाऱ्या सर्व पत्रकारांच्या सामाजिक सेवाकार्याचे, लेखणीचे कौतुक यावेळी करण्यात आले. पत्रकार प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर महाजन व अमित खोत यांचा मालवण एसटी आगाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला, अशी माहिती जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.