केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणेंवर गुन्हा दाखल
दिशा सालीयन कुटुंबाच्या तक्रारीनंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा
मुंबई: सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनची बदनामी केल्या प्रकरणी सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियनप्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याचं सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं.