मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थासाठी वैभव नाईकांचे देवी भराडी चरणी साकडे !

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त गुरुवारी आंगणेवाडीला भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी देवीच्या चरणी साकडे घातले.

आमदार वैभव नाईक दरवर्षी सातत्याने आंगणेवाडीत भराडीदेवीच्या उत्सवासाठी उपस्थिती दर्शवतात. गुरुवारी सकाळपासून त्यांनी आंगणेवाडीत उपस्थित राहात यात्रेचा आढावा घेतला. यावेळी देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपण कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे आई भराडीला घातल्याचे वैभव नाईक म्हणाले. कोरोनाची महामारी हळूहळू कमी होत आहे. परंतु ती संपूर्ण नष्ट होऊ देत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी. या जिल्ह्याच्या विकासासाठी ते भरीव योगदान देत आहेत. सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज त्यांनी मंजूर केले असून येत्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा, त्यासाठी देवीने आम्हाला शक्ती द्यावी, असे वैभव नाईक म्हणाले. भराडी देवीकडे आम्ही कधीही राजकारण आणले नाही. देवीने आजवर आम्हाला भरभरून दिले आहे. सिंधुदुर्गात आज शिवसेनेचे वर्चस्व आहे, मुख्यमंत्री देखील शिवसेनेचा दिला आहे. ही सर्व भराडी देवीची कृपा असून देवीने आम्हाला न मागता सर्वकाही दिल्याचे वैभव नाईक म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!