एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नगरपालिका निवडणूकांचे बिगुल वाजणार ?

राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकांचा मार्ग मोकळा

कुणाल मांजरेकर

मालवण : राज्यातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या असेच नवनिर्मित अशा २०८ नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून “क” वर्ग नगरपालिकांसाठी २ मार्च रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांना मार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला जाणार आहे. १ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयुक्तांकडून मान्यता देण्यात येणार असून ५ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांचा समावेश आहे जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषदांचा समावेश आहे.

राज्यातील अनेक नगरपरिषदांचा कार्यकाल संपला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. यापूर्वी मुदत संपलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर आता नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. नगरपालिकांकरिता यंदा सदस्य संख्या वाढल्याने प्रारुप प्रभाग रचनेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या दृष्टीने निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागवणे, सुनावणी देणे इत्यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला आहे.

असा असेल प्रभाग रचनेचा कार्यक्रम

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. यामध्ये प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव ( नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती ची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची कार्यवाही मुख्याधिकारी यांच्याकडून २ मार्च पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली जाणार आहे. ७ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हरकती व सूचना तसेच सुनावणी होणार आहे. यामध्ये प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे (अधिसूचना कलम १० नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागवण्या करता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर १० मार्च पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १० मार्च ते १७ मार्च पर्यंत यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार असून प्राप्त हरकती व सूचनांवर २२ मार्च पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती व सूचना यांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे जिल्हाधिकारी २५ मार्च पर्यंत अहवाल पाठवणार असून राज्य निवडणूक आयुक्तांकडून १ एप्रिल पर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार आहे. अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून ५ एप्रिल रोजी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!