शिवसेनेचा माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर ; भाजपकडून मिळणार “मानाचं पद”

प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले ; नारायण राणेंच्या उपस्थितीत लवकरच कार्यकर्त्यांसह प्रवेश

कुणाल मांजरेकर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सत्ता थोडक्यात हुकल्यानंतर भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांना भाजपने प्राथमिक सदस्यत्व बहाल केले आहे. लवकरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत श्री. भोगटे आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येत आहे. यासाठी भाजप कडून गणेश भोगटे यांना संधी देण्यात येणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपाने ८ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनण्याचा बहुमान मिळवला असला तरीही शिवसेनेचे ७ आणि काँग्रेसचे २ नगरसेवक मिळून ९ जणांनी नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळवुनही नगरपंचायतवर सत्ता स्थापन करता न आल्याचे शल्य भाजपाला कुडाळ मध्ये आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांना भाजपने आपल्या गोटात आणले आहे. गणेश भोगटे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. पण अलीकडेच त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नगरपंचायत निवडणूकीत त्यांनी आपल्या प्रभागातून काँग्रेसची नगरसेविका निवडून आणली आहे. त्यामुळे त्यांना भाजपा मध्ये घेऊन विधानसभा निवडणुकी बरोबरच आगामी काळात कुडाळ नगरपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहेत.

गणेश भोगटे यांनी स्वीकारले भाजपचे सदस्यत्व

गणेश भोगटे यांनी भाजपात थेट प्रवेश न करता गुरुवारी सायंकाळी उशिरा भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. यावेळी त्यांचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा कार्यकारणी आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका कु चांदणी कांबळी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गणेश भोगटे कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत.

स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी ?

गणेश भोगटे यांचे कुडाळ मध्ये वर्चस्व आहे. त्यांनी स्वतःच्या प्रभागात काँग्रेसची नगरसेविका निवडून आणली आहे. त्यामुळे भाजपने त्यांना पक्षात घेऊन स्वीकृत नगरसेवक पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच पक्ष प्रवेश करण्यापूर्वी त्यांना भाजपचे सदस्यत्व बहाल करण्यात आल्याचे समजते.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!