करूळ घाटात कंटेनर पलटी ; चार तासानंतर एकेरी वाहतूक सुरू

खड्डेमय घाटमार्गात अपघाताची मालिका सुरूच ; छोटी वाहने मार्गस्थ, पण मोठी वाहने अजूनही अडकून

वैभववाडी : खड्डेमय करूळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता करूळ घाटात धोकादायक वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे घाट मार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कंटेनर हटवून येथून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे छोटी वाहने मार्गस्थ झाली असली तरी अजूनही मोठी वाहने येथे अडकून पडली आहेत. वैभववाडी पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

फोकलेन मशीन घेऊन हा कंटेनर (नं एमएच 43- यु – 8562) पुण्याहून गोव्याकडे जात होता. करुळ घाटात पायरी घाट नजीक धोकादायक वळणावर कंटेनरचा अचानक चेस तुटल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक बालबाल बचावला आहे. तर कंटेनरचे व फोकलेन मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे करुळ घाटातील वाहतूक ठप्प झाली. यामुळे घाटात कंटेनरच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामार्गे एकमेव सुरू असलेली राजापूर – सोलापूर ही एसटी बस घाटात अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. क्रेनच्या सहाय्याने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कंटेनर बाजूला केल्यानंतर या मार्गातून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
मात्र अजूनही अवजड वाहने अडकून पडली आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!