तुम्ही म्हटलात म्हणून अटक करायला मोगलाई आहे काय ?
चंद्रकांत पाटील यांचा सवाल ; भाजप राणेंच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य
राणेंच्या दौऱ्याला मिळणाऱ्या पाठींब्यामुळे शिवसेना बिथरल्याचा आरोप
मुंबई: नारायण राणे, संजय राऊत यांच्या सारख्या नेत्यांची बोलण्याची स्वतःची स्टाईल आहे. त्यानुसार राणे बोलले म्हणून एवढी आगपाखड करायची गरज काय ? राणेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना समज देणे इथपर्यंत ठीक होतं. पण अटक करण्यासाठी पोलीस पाठवणे म्हणजे सत्तेचा टोकाचा दुरुपयोग असून शिष्टाचारानुसार कोणत्याही राज्य सरकारला केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही, मग कोणत्या नियमात पोलीस राणेंना अटक करायला निघालेत ? महाराष्ट्रात मोगलाई आहे का ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपा राणेंच्या पूर्ण पाठीशी असल्याचं ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण केलं ते काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल त्यांनी केला. राणेंची एक कार्यपद्धती आहे. त्यांची बोलण्याची स्टाईल आहे. रावसाहेब दानवेंची एक बोलण्याची स्टाईल आहे. त्यातून समजा एखादा आक्षेपहार्य शब्द आला असेल तर थेट केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला अटक? त्याला काही समज देणं किंवा त्याच्यावर म्हणणं हे असं शकतं. एखाद्या नेत्याने प्रतिक्रिया दिल्यावर त्यावर बोलणं हा प्रघात आहे. पण त्यावर लगेच गुन्हा दाखल करा आणि अटक…? ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे ते पेंडिग आहेत. संजय राठोडचं काय झालं? कुठे अडलं? राष्ट्रवादीच्या युवा नेत्यावर बलात्काराचा आरोप आहे त्याचं काय झालं?, असे सवालही त्यांनी केले.