आ. नितेश राणेंना जामीन मंजूर ; कार्यकर्त्यांत जल्लोष

अखेर सत्याचा विजय : सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

मुंबई ते सिंधुदुर्ग कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष; एकच घोषणाबाजी

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात महिनाभर न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने बुधवारी आ. राणे यांची ३० हजाराच्या जातमूचलक्यावर मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, आ. राणेंच्या जामिनानंतर सोशल मीडियावर जोरदार बॅनरबाजी सुरू करण्यात आली आहे. तर मुंबई ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष सुरू आहे. आ. नितेश राणे कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल असून त्यांच्या मुक्ततेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात अनेक दिवसांच्या कोर्टकचेरीनंतर अखेर भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. नितेश राणे यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावली असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटीशर्ती घातल्या आहेत. नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली असून आठ दिवसांतून एकदा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे आणि तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहे. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये असेही कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांना जामीन दिल्ल्याबद्दल कार्यकर्त्यांनी न्यायालयाचेही आभार मानले आहेत. कायम सत्याचा विजय असतो, असे म्हणत कार्यकर्ते उत्साहात आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी टायगर अभी जिंदा है, अशा घोषणा दिल्या आहे. विजय सत्याचाच, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा आशयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर राणेंच्या फोटोसह ट्रेंड होत आहेत. एकंदर नितेश राणेंच्या जामिनानंतर भाजपच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

आमदार नितेश राणे यांच्या जामिनानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. भाजपा लालबाग कार्यालय येथे फटाक्यांची आतषबाजी आणि लाडू वाटप करून तसेच सत्यमेव जयतेचे पोस्टर झळकावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सिंधुदुर्गात देखील ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी हर्षद पाटील,महेश पावसकर,विकास पवार,संकेत बावकर, रुपेश गांगण, भुवनेश परब यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!