आ. नितेश राणे प्रकरणी सरकारी पक्षाची “ही” मागणी न्यायालयाने फेटाळली
जामीन अर्जावरील निर्णय काहीच वेळात शक्य ; जिल्हा न्यायालयात जोरदार युक्तिवाद
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर अवघ्या काही वेळात निर्णय अपेक्षित आहे. या प्रकरणी ओरोस जिल्हा न्यायालयात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या जामिनाचा निर्णय वरिष्ठ न्यायालयात वर्ग करण्याची सरकारी पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे न्या. आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.
शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जामीन अर्जावर ओरोस जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत यांनी संतोष परब हल्ला प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायालया समोर झाली, त्या न्यायालयात सुनावणी घेण्याचा अर्ज सादर केला होता. मात्र ही मागणी आज न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे न्या. रोटे यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. आज न्यायालय ५.४५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने युक्तिवाद तोपर्यंत आटोपल्यास याचा निकाल आज येण्याची शक्यता आहे.