अखेर दशावताराचा राजा अनंतात विलीन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं सांत्वन

सुधीर कलिंगण यांच्या नावाने सिंधुदुर्गात कलादालन निर्माण करूया : आ. वैभव नाईक यांची संकल्पना

कुणाल मांजरेकर

दशावतारी लोककलेचा राजा सुधीर कलिंगण यांचं सोमवारी आकस्मिक निधन झालं. त्यांच्या निधनाने अवघं कोकण हळहळलं. सोमवारी दुपारी नेरूर गावी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दूरध्वनीवरून कलिंगण कुटुंबीयांचं सांत्वन केलं. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी ही माहिती दिली. सुधीर कलिंगण यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक कलेची फार मोठी हानी झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात त्यांचं कलादालन निर्माण करण्याची संकल्पना आ. नाईक यांनी मांडली आहे.

कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी लोकराजा सुधीर कलीगंण यांचं सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने गोवा येथील व्हिजन हॉस्पिटलमध्ये निधन झालं. काल रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातील व्हिजन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच उपचारांदरम्यान पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी दशावतारी लोककलेच्या या राजाच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांचं राज्य सरकार आणि शिवसेनेच्या वतीने सांत्वन करून त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.

दशावतारी कलेतला आज राजा गेला ; वैभव नाईकांकडून श्रद्धांजली

सुधीर कलिंगण यांनी दशावतारी लोककला घराघरांत पोहोचवली. त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया आ. वैभव नाईक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने दूरध्वनीवरून त्यांचं सांत्वन करून त्यांच्या दुःखात शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार सहभागी असल्याचं म्हटलं आहे. सुधीर कलिंगण यांच्या नावाने एखादं कलादालन निर्माण होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असं सांगून दशावतारी कलेतला आज राजा गेला, अशाशब्दात वैभव नाईक यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!