गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर महिनाभर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. दरम्यान कोरोनामुक्त झाल्या नंतरही अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक पर्व लतादीदींच्या निधनानं संपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानं देशभरात शोककळा पसरली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. गेल्या २९ दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. 


९२ वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

लतादीदींच्या निधनाने मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यामुळे आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून त्यांचे स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

शरद पवार यांनी केला शोक व्यक्त

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!