संघर्ष भडकणार … सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधून राणे समर्थक चिपळूणला रवाना
राणेंच्या जुहू बंगल्या बाहेर देखील राणे समर्थकांचा जमाव
सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस चिपळूणकडे रवाना झाले आहेत. तर शिवसैनिक देखील राणेंविरोधात आक्रमक झाले असून या पार्श्वभूमीवर पोलीस आणि शिवसैनिक विरोधात राणे समर्थक यांच्यात संघर्ष भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राणेंना अटक होण्याची शक्यता लक्षात घेता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मधून मोठ्या प्रमाणात राणे समर्थक चिपळूण कडे रवाना झाले आहेत. तर राणेंच्या जुहू येथील बंगल्या समोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिल्यानंतर राणे समर्थक दखल मोठ्या संख्येने जुहू बंगल्या समोर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.