कुडासे खुर्द ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत दोन सदस्य बिनविरोध
सदस्यपदी गोविंद नाईक व संजना सावंत यांची बिनविरोध निवड
दोडामार्ग : कुडासे खुर्द पाल पुनवर्सन ग्रामपंचायतीच्या रिक्त दोन जागा नागरिकाचा मागासप्रवर्ग यासाठी आरक्षित होत्या. ते आरक्षण रद्द झाल्याने या जागांसाठी खुल्या प्रवर्गातून निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये प्रभाग एक मधून गोविंद महादेव नाईक तर प्रभाग दोन मध्ये संजना संजय सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान सरपंच, सदस्य आणि पाल पुनवर्सन ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या ग्रामपंचायतीत यापूर्वी विद्यमान सरपंच पॅनेलने ५ पैकी ५ जागा जिकल्या होत्या. आता ७ जागांवर निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे पुन्हा एकहाती सत्ता राखण्यात त्यांना यश आले आहे.
तिलारी आंतरराज्य प्रकल्प बाधीत पाल गावचे पुनवर्सन कुडासे खुर्द या ठिकाणी करण्यात आले आहे. या नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतची निवडणूक आयोगाने जाहीर केली. यामध्ये पहिली निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतरच्या निवडणूकीत विद्यमान सरपंच संगिता देसाई यांच्या पॅनेलने ५ पैकी ५ जागा एकतर्फी जिंकल्या होत्या. यामध्ये तत्कालीन सरपंच संगिता सुहास देसाई, पत्रकार संदेश बाबासाहेब देसाई, सानवी संदीप दळवी, मयुरी महेश पालव, सुरत कृष्णा शिरसाठ आदी पाच जणांचा समावेश होता. त्यापैकी दोन जागा नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री व पुरुष यासाठी आरक्षित होत्या. त्यामुळे त्या दोन जागा रिक्त होत्या. त्या जागी आरक्षण रद्द होऊन खुल्या प्रवर्गातील उमेदवार यांना निवडणूक लढविण्यास शासन निर्णय झाला होता. पुर्वीच आरक्षण रद्द झाले असल्याने बरीच वर्षे रिक्त जागी सदस्य निवडणूक झाली. त्यामुळे कुडासे खुर्द ग्रामपंचायत खुला प्रवर्गातील दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. या ठिकाणी प्रभाग क्रमांक १ मध्ये गोविंद महादेव नाईक तर प्रभाग २ मध्ये सौ. संजना संजय सावंत या बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शेळके यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सरपंच, सदस्य व ग्रामस्थांकडून अभिनंदन
नवनिर्वाचित सदस्य गोविंद नाईक यांचे संदेश देसाई यांनी व संजना सावंत यांचे सरपंच संगिता सुहास देसाई यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सानवी दळवी, मयुरी पालव, जेष्ठ ग्रामस्थ कृष्णा देसाई, माजी सैनिक अर्जुन नारायणराव राणे, रमाकांत सावंत, संदीप दळवी, राहुल राणे, गणपत देसाई, भिवा पालव, महादेव सावंत, भरत नाईक, सुहास देसाई, महेश पालव, राजाराम देसाई, अनिल सावंत, निखिल नाईक यांच्या सह महिला, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.