कोरोना प्रतिबंधासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बंध लागू ; रात्री ११ ते ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय फिरण्यास बंदी !

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश जारी ; पर्यटन स्थळे बंदच

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का.) कोविड- १९ (ओमिक्रोन) विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना फिरण्यास बंदी राहणार आहे.

या आदेशात म्हटले आहे, नागरिकांचे बाहेर फिरणे – पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत बंदी राहील. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री ११ वाजलेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत बंदी राहील.
शासकीय कार्यालय – महत्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना अभ्यांगतास भेट घेण्यावर बंदी राहील. कार्यालय प्रमुखांनी अभ्यांगत/ नागरिकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी. बाहेरून येणाऱ्या अभ्यांगत/ नागरिकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था करावी. कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फॉर्म होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळामध्ये बदलाचाही विचार करू शकतील. कार्यालय प्रमुखांनी कोव्हीड अनुरूप वर्तणूकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.
खाजगी कार्यालये – कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फॉर्म होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात 50 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच कर्मचाऱ्यासाठी वेळामध्ये बदल करण्याचा विचार करावा. कार्यालये 24 तास सुरु ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल, तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येवू शकेल. अशा प्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोय विचारात घेण्यात यावी. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणेत यावे. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोव्हीड अनुरूप वर्तणूकीचे तंतोतत पालन करतील याची दक्षता घ्यावी. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.
लग्न समारंभासाठी कमाल 50 व्यक्तींना परावनगी असेल, अंत्यविधीसाठी कमाल 20 व्यक्तींना परवानगी असेल. तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम यांना कमाल 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल.
शाळा आणि महाविद्यालये, कोचिंग क्लासेस – खाली दिलेल्या बाबी वगळता सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील, विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबबावयाचे उपक्रम. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करायचे कामकाज. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणाकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम. या निर्बंधाना अपवादाच्या स्थितीत या विभागांना आणि प्राधिकरणांना नडीच्या व अडचणींच्या प्रसंगी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.
ब्युटी सलून्स – 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. सर्व ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. येथे येणाऱ्या सर्व नागरिकांनी व सेवा देणारे यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, व मास्क काढावा लागेल अशा सेवा पुरविता येणार नाही. सेवा देणाऱ्या कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
व्यायामशाळा (जिम) – 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. येथे येणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. येथे येणाऱ्या सर्व नागरिकांनी व सेवा देणारे यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. सेवा देणाऱ्या कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
स्विमिंग पूल, वेलनेस सेंटर्स,स्पा – पूर्णतः बंद
हेअर कटिंग सलून – 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. रोज रात्री 10 वाजलेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनेमध्ये इतर सुविधा बंद राहतील. हेअर कटिंग सलून्सनी कोव्हीड अनुरूप वर्तणूकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
खेळांच्या स्पर्धा – आधीच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरु राहतील. अ) प्रेक्षकांना बंदी राहील. ब) सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यासाठी बायो-बबल क) सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडूसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील. ड) सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी दर तीन दिवसांनी RTPCR / RAT चाचणी करावी. सिंधुदुर्ग जिल्हा पातळीवरील खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी असणार आहे.
मनोरंजन स्थळे, प्राणीसंग्राहालय, वस्तूसंग्राहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे/नागरिकांसाठीचे कार्यक्रम/ स्थानिक पर्यटन स्थळे – पूर्णपणे बंद राहतील.
शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये बंधनासह प्रवेश – 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील. सर्व अभ्यांगत / नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणांवर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकाची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असेल. सर्व शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिक आणि कर्मचारी कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तंतोतंत पालन करतील, याची दक्षता घेण्यासाठी संबधित आस्थापनांनी स्वतंत्र यंत्रणा नेमावी. कोव्हीड चाचणी करणेसाठी शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सच्या आवारात बूथ नेमावेत. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश देण्यात यावा. शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे – जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. सर्व आगंतुक / नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणांवर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकाची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असेल. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच रेस्टॉरंट्स, उपाहारगृहामध्ये परवानगी देण्यात येईल. रेस्टॉरंट्स, उपाहारगृहामध्ये दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील. दररोज होम डिलिव्हरीला परवानगी असेल.
नाट्यगृहे, चित्रपटगृहे – जिल्ह्यातील सर्व नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. सर्व आगंतुक / नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणांवर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकाची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असेल. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच नाट्यगृहे, चित्रपटगृहामध्ये परवानगी देण्यात येईल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
आंतरराष्ट्रीय प्रवास – भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार.
देशांतर्गत प्रवास – कोव्हीड विरोधी दोन लसी किंवा जिल्ह्यात प्रवेश करण्याआधी 72 तासापूर्वी RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ग्राह्य धरण्यात येईल. हे निर्बंध हवाई, रेल्वे आणि रस्ता या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहतील. प्रवास करणारे वाहन चालक, वाहक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यांनाही सदर निर्बंध लागू राहतील.
कार्गो ट्रान्सपोर्ट, औद्योगिक कामकाज, इमारतींचे बांधकाम – लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तीकडून सुरु राहील.
सार्वजनिक वाहतूक – पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित वेळांनुसार
युपीएससी, एमपीएससी, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था ई. द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा – राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार पार पाडल्या जातील. अशा परिक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यास पुरेसे असेल. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा, ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील.
परीक्षांचे संचालन करताना कोव्हीड अनुरूप वर्तणूकांच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल.

  1. प्रवासासाठी अत्यावश्यक कारणे
    1. वैद्यकीय तातडी
    2. अत्यावश्यक सेवा (अत्यावश्यक सेवांची यादी परिशिष्ट 1 मध्ये दिल्यानुसार राहील.)
    3. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे जाणे किंवा येण्यासाठी वैध तिकीटासह
    4. 24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयांसाठी, विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांचा प्रवास
      अत्यावश्यक मानला जाईल.
  2. कोव्हिड अनुरूप वर्तणूकीचे नियम परिशिष्ट 2 मध्ये नमूद केल्यानुसार राहतील.
  3. दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किंवा होम डिलीव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल. या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळानंतर सदर आस्थापनेने RAT चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
    सदरचा आदेश संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी लागू राहील.
    परिशिष्ठ – 1
    अत्यावश्यक सेवा
    अत्यावश्यक सेवा मध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल –
  4. रुग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यामध्ये सहाय्यभूत निर्मिती आणि वितरण युनीटस् सह विक्रेते, वाहतुकदार व पुरवठा साखळी यांचा समावेश असेल. त्याशिवाय लस, सॅनिटायझर, मास्क, वैदयकीय उपकरणे, त्यास पुरक कच्चा माल निर्मिती उदयोग व सहाय्यभूत सेवा यांचाही समावेश असेल.
  5. पशुवैदयकीय सेवा / पाळीव प्राणी काळजी केंद्र व त्यांची खादय दुकाने.
  6. वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.
  7. विमान वाहतूक आणि संबंधित सेवा (विमान सेवा, विमानतळ देखभाल, कार्गो, ग्राउंड सेवा, खानपान, इंधन, सुरक्षा इ.)
  8. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, कच्चे / प्रक्रिया केलेले/शिजवलेले
    अन्न विकणारी सर्व प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने,
  9. शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा.
  10. सार्वजनिक परिवहन – विमानसेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस वाहतूक.
  11. विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.
  12. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे.
  13. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा
  14. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा
  15. SEBI प्राधिकृत बाजार व कार्यालये, Stock Exchange, व त्यासंबंधित अन्य आस्थापना
  16. दूरध्वनी संबंधित सेवा
  17. मालाची / वस्तुंची वाहतुक.
  18. पाणी पुरवठा सेवा.
  19. कृषी विषयक सेवा सुरळीतपणे चालू ठेवणेसाठी आवश्यक शाखा यामध्ये शेतीच्या साधनांची उपलब्धता, बियाणे,
    खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती यांचा समावेश राहील.
  20. सर्व वस्तूंची आयात – निर्यात
  21. ई कॉमर्स.
  22. मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा
  23. पेट्रोल पंप व पेट्रोलियम उत्पादने (जसे की समुद्रातील व किनाऱ्यावरील उत्पादने)
  24. सर्व कार्गो सेवा
  25. डेटा सेंटर / क्लाऊड सेवा /आय टी सेवा ज्या पायाभुत सुविधा आणि सेवा पुरवितात.
  26. सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा
  27. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा
  28. एटीएम सेवा
  29. टपाल सेवा
  30. बंदरे आणि त्यासंबंधीच्या कृती
  31. लस / जीवनरक्षक औषधे / औषधी उत्पादने यांचे संबंधी वाहतुक करणारे कस्टम हाऊस एजंट परवानाधारक मल्टी
    मोडल ऑपरेटर्स
  32. कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल / पॅकेजींग साहित्य बनविणाऱ्या आस्थापना
  33. आगामी पावसाळयासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने
  34. केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारची कार्यालये, ज्यामध्ये किंवा त्यांचे वैधानिक अधिकारी आणि संस्था यांचा
    समावेश आहे
  35. सहकारी, PSU आणि खाजगी बँका
  36. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये
  37. विमा/ मेडिक्लेम कंपन्या
  38. फार्मास्युटिकल कंपनी कार्यालयांना उत्पादन/वितरणाचे व्यवस्थापन आवश्यक आहे
  39. RBI नियमन केलेल्या संस्था आणि मध्यस्थ ज्यात स्टँडअलोनप्राइमरी डीलर्स, CCIL, NPCL यांचा समावेश आहे. पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि फायनान्शिअल मार्केट पार्टिसिपंट्स RBI नियंत्रित मार्केटमध्ये कार्यरत आहेत.
  40. सर्व बिगर बँकिंग वित्तीय निगम
  41. सर्व सूक्ष्म वित्त संस्था
  42. न्यायालये, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगाचे कामकाज चालू असल्यास वकिलांची कार्यालये.
  43. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा.

परिशिष्ट – 2
कोव्हीड अनुरूप वर्तन (CAB)
व्याख्या – कोव्हीड अनुरूप वर्तनची व्याख्या कोव्हीड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याद्वारे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांनी पाळली जाणारी दैनदिन सामान्य वागणूक होय. कोव्हीड अनुरूप वर्तन म्हणून विशेषतःअसलेल्या वर्तवणूकीच्या दृष्टीने आधी नमूद केलेले कोव्हीड 19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करू शकणारे अशा सर्व गोष्टींचा यामध्ये सामावेश आहे.
मुलभूत कोव्हीड अनुरूप वर्तनविषयक नियम खालीलप्रमाणे आहेत.

  1. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल.)
  2. जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.
  3. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
  4. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा
  5. योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.
  6. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा.
  7. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे.
  8. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  9. आवश्यकते शिवाय घराबाहेर जाणे टाळा.
  10. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा.
  11. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार/अभिवादन करा.
  12. कोविड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन,

अ) कामाच्या ठिकाणी कोव्हीड अनुरूप वर्तन

  1. कामाच्या ठिकाणी काम करण्याची परवानगी तसेच कामाच्या कोणत्याही शिफ्टमध्ये कामाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकणाऱ्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची परवानगी शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या आदेशानुसार असेल.
  2. वर नमूद कोव्हीड अनुरूप वर्तनमध्ये म्हटल्याप्रमाणे कोव्हीड अनुरूप वर्तनाचे अनुसरण करणेस प्रवृत्त करणेबाबत संबधित आस्थापना मालक कामाच्या ठिकाणी गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कोव्हीड अनुरूप वर्तनासाठी जबाबदार असेल. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमधील सामाजिक अंतराची खात्री दोन शिफ्टमधील पुरेसे अंतर, कर्मचाऱ्यांचे दुपारचे जेवण, विश्रांतीची वेळ सुनिश्चित करणेत यावी. कोणत्याही शिफ्टमध्ये कमी गर्दी सुनिश्चित करण्यासाठी तसेच काम बंद झाल्यामुळे, उत्पादित करण्यात येणाऱ्या मालावर परिणाम झाल्यास, सदर अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने शिफ्टची संख्या वाढविण्यात येवू शकते.
  3. कार्यालय प्रमुख यांनी थर्मल स्कनिंग, सॅनिटायझरसाठी शक्यतो संपर्क विरहीत मशीन्सची तरतूद कार्यालयाच्या आगमनाच्या व निर्गमनाच्या ठिकाणी तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी करणेची आहे. तसेच पुरेश्या प्रमाणात सॅनिटायझर व हात धुण्यासाठी व्यवस्था करणेची आहे.
  4. संपूर्ण कार्यालय तसेच कर्मचारी यांच्या संपर्कात येणारे उदा. दरवाज्याचे हँडल इ. ठिकाणे ठराविक वेळेनंतर निर्जंतुक करणेत यावी.
  5. आरोग्य सेतू अपचा वापर खाजगी व सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी याचेसाठी अनिवार्य राहील.
  6. कोविड 19 रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकृत असलेल्या जवळच्या भागातील रुग्णालये/दवाखाने यांची अद्यावत यादी कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणेत यावी. तसेच एखाद्या कर्मचाऱ्यास कोव्हीड 19 ची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास संबधितास तात्काळ तपासणीसाठी पाठविण्यात यावे, व त्याची चाचणी होईपर्यंत त्यास विलगीकरणात ठेवण्यात यावे.
    ब) लग्नसमारंभ
  7. लग्नसमारंभात उपस्थित अतिथींची संख्या व कार्यक्रमाचे तास शासनाचे नियमानुसार सक्षम प्राधिकारी ठरवून देतील त्याप्रमाणे लागू राहील.
  8. लग्नसमारंभात उपस्थित सर्वांनी तसेच लग्नसमारंभाच्या ठिकाणी सेवा देणारे या सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच समारंभाच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील.तसेच कोव्हीड अनुरूप वर्तणूकीचे पालन करणे बंधनकारक राहील.
  9. जेवणाची सेवा देताना एकमेकांशी संपर्क येणार नाही याप्रमाणे नियोजन करणेत यावे. हॉटेल मध्ये जेवणाची सोय करणेत आल्यास तेथे रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे यासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेत यावे. अशा ठिकाणी एकावेळी रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे यांच्या पूर्ण क्षमतेच्या 50 टक्के एवढ्याच अतिथींना जेवण पुरविण्यात येईल.
  10. लग्नसमारंभाच्या ठिकाणी सभागृह प्रमुखांने थर्मल स्कनिंग, सॅनिटायझर, Hand Wash इ. ची सोय करणेत यावी. तसेच लग्न समारंभाच्या ठिकाणी सेवा देणारे सर्व कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील.
  11. वरील नियमांचे सभागृह चालक, कर्मचारी, समारंभास जमा होणारे अतिथी, वधू- वर यांचेकडून उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार दंड आकारण्यात येईल. एखादी आस्थापना सदर नियमांचे वारंवार व जाणीपूर्वक उल्लंघन करीत असल्याचे संबधित यंत्रणेच्या निदर्शनास आल्यास सदर आस्थापना बंद करण्यात येईल.
    क) अंत्यसंस्कार आणि अंतिम संस्कार
  12. अंत्यसंस्कार आणि अंतिम संस्कारासाठी जमणारे सर्व व्यक्ती वर नमूद कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन करतील, तसेच सर्वाना मास्क वापरणे व सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील.
  13. अंत्यसंस्कार आणि अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची संख्या शासनाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे
    बंधनकारक राहील.
  14. कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन होत असल्याची खबरदारी स्थानिक स्वराज्य संस्था/ ट्रस्ट / संस्था यांची राहील.
    ड) इतर सामाजिक, धार्मिक, निवडणूक, मनोरंजन किंवा सांस्कृतिक संमेलने –
  15. सामाजिक, धार्मिक, निवडणूक, मनोरंजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या शासनाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे बंधनकारक राहील.
  16. कार्यक्रमामध्ये जेवण दिले जात असेल तर त्याची स्वतंत्र व्यवस्था शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार करण्यात यावी.
  17. कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व व्यक्ती वर नमूद कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन करतील, तसेच सर्वाना मास्क वापरणे व सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील.
  18. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन न झाल्यास किंवा शासनाने लागू केलेले निर्बंधाचे उल्लंघन झाल्यास त्यास ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असेल तेथील मालक जबाबदार राहील.
  19. निवडणूक संबधित मेळावे किंवा उपक्रम यासाठी संबधित निवडणूक अधिकारी उपस्थितांची संख्या निश्चित करतील.
    इ) सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक मध्ये कोव्हीड अनुरूप वर्तन –
     टॅक्सी/ ऑटो आणि इतर खाजगी वाहतूक करणारे (बस/ट्रेन वगळून)
  20. सर्व टॅक्सी/ ऑटो आणि इतर खाजगी वाहतूक करणारे यांनी वाहतुकीच्या प्रत्येक फेरीनंतर संपूर्ण वाहन निर्जंतुक करणे आवश्यक राहील.
  21. प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी व चालक यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. मास्क घातल्याशिवाय किंवा योग्यरित्या मास्क न घातल्यास संबधित यंत्रणा, प्रवासी तसेच टॅक्सी चालकास नियमानुसार दंड आकारण्यात येईल.
     बसेस
  22. शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेल्या प्रवासी क्षमतेच्या अधीन राहून प्रवास करता येईल.
  23. प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी व चालक यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. मास्क घातल्याशिवाय किंवा योग्यरित्या मास्क न घातल्यास तसेच कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या प्रवासी यास बस मधून प्रवास करता येणार नाही.
  24. कोव्हीड अनुरूप वर्तन न करणाऱ्या प्रवासी विरुद्ध सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणांना या अंतर्गत दंड आकारण्याचा अधिकार असेल.
     रेल्वे प्रवास –
    बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावाहून येणाऱ्या ट्रेनच्या बाबतीत, सर्व प्रवाशांना मास्क वापरणे अनिवार्य राहील, ट्रेनच्या सामान्य बोगीमधून उभे राहून प्रवास करण्यास परवानगी असणार नाही. सदर नियमांचे पालन न केल्यास उल्लंघन करणाऱ्यांना रु. 500 इतका दंड आकारला जाईल.
     खाजगी गाड्या
  25. खाजगी कारमधून प्रवास करताना एकाच कुटुंबातील व्यक्तीशिवाय अन्य व्यक्ती प्रवास करीत असतील तर मास्क वापरणे बंधनकारक राहील, मास्क वापरल्याशिवाय प्रवास करताना आढळल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून नियमानुसार दंड आकरण्यात येईल.
    ई) दुकाने/मॉल्स/थिएटर्स आणि इतर आस्थापना
  26. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद वेळेमध्ये संबधित आस्थापना सुरु ठेवता यतील.
  27. दुकाने/मॉल्स/थिएटर्स आणि संबधित इतर आस्थापना यांचे मालक त्यांच्या आस्थापनांना भेट देणारे सर्व अभ्यागत, सेवा देणारे कर्मचारी यांनी कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक असेल. कर्मचारी किंवा अभ्यंगत यांनी कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास दुकान मालकासह कर्मचारी/ अभ्यांगत यांना नियमानुसार दंड आकारण्यात येईल. तसेच एखाद्या आस्थापनेकडून सदरची चूक वारंवार होत असल्याचे स्थानिक आपत्ती व्यस्थापन यंत्रणेच्या निदर्शनास आल्यास अशा आस्थापनां बंद करण्यात येतील.
    उ) दंड/ शास्ती
     या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.
     ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९-ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
     जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:च कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

 जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
 कोणतीही संस्था किंवा आस्थापना किंवा एजन्सी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशामधील नियमांचे पालन करत नाहीत अशी स्थानिक प्राधिकरणाची खात्री झाल्यास त्यांना रु. 50,000/- चा दंड आकरण्यात येईल, व संबधित आस्थापना कोव्हीड – 19 ची अधिसूचना संपेपर्यंत बंद करण्यात येईल.
कोणतीही व्यक्ती/ आस्थापना / संस्था कोव्हीड अनुरूप वर्तनाचे नियमांचे वारंवार उल्लंघन करत असेल तर
सदर व्यक्ती/ आस्थापना / संस्था भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 26/270 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील.
 कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/आदेशांनुसार असतील.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!