… अन् “त्या” माजी नगराध्यक्षाने टराटरा फाडला स्वतःचा उमेदवारी अर्ज !

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूक रणधुमाळीत रंगला “हाय प्रोफाइल” ड्रामा

वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत मधील चार जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाला. पक्षाने आपणाला उमेदवारी नाकारल्याचे लक्षात येताच एका माजी नगराध्यक्षाने स्वतःचा भरलेला उमेदवारी अर्ज कार्यालयातच टराटरा फाटत बाणाच्या वेगाने घर गाठले. या प्रकाराची जोरदार चर्चा वैभववाडीत सुरू होती. तिकीट मागणाऱ्या दोघा पदाधिकाऱ्यांच्या भांडणात तिसऱ्याचा मात्र याठिकाणी लाभ झाला आहे.

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत च्या प्रभाग क्रमांक ३,५,१५ आणि १६ या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग ३ आणि ५ याठिकाणी महिला आरक्षण आहे. तर प्रभाग १५ मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच होती. ओबीसी आरक्षण असताना यापूर्वी या प्रभागात एका माजी नगराध्यक्षाला तिकीट फायनल करण्यात आली होती. परंतु ओबीसी जागांवरील निवडणूक स्थगित झाली. त्यानंतर फेर आरक्षणात हा प्रभाग सर्वसाधारणसाठी राखीव झाला. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची संख्या वाढली. त्याच पक्षातील शहर पदाधिकाऱ्याने प्रभाग १५ मध्ये मीच दावेदार असल्याचे उपस्थित नेत्यांना सांगितले. त्यावरून शहर पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष यांच्यात जोरदार चकमक उडाली. प्रमुखांनी यात बघ्याची भूमिका घेतल्याने त्या माजी नगराध्यक्षाने भरलेला अर्ज कार्यालयातच टराटरा फाडला. व तुमचं बघतो अशी धमकी देत घर गाठले. या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला आहे. पक्षाने दोघांनाही बाजूला करत तिसऱ्याला उमेदवारी दिली आहे. या नाट्याची चर्चा वैभववाडीत दिवसभर सुरू आहे. पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे निवडणुकीत पक्षनेत्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!