पेट्रोल पंपावर डल्ला मारणारे चोरटे जेरबंद ; पाचही चोरटे घाटकोपर मधील !
करूळ चेकपोस्टवर वैभववाडी पोलिसांची कारवाई ; तब्बल ३० मोबाईलसह रोकड हस्तगत
वैभववाडी : ओरोस येथील सिद्धी पेट्रोलपंपावर चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांना करूळ चेक नाक्यावर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणातील पाच आरोपींच्या केवळ तीन तासात वैभववाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सतर्कतेमुळे वैभववाडी पोलिसांना हे यश मिळाले आहे. सर्व आरोपी घाटकोपर येथील आहेत. आरोपींकडे ५७ हजार रुपये रोकड व ३० चोरीचे मोबाईल मिळून आले आहे. ही घटना करूळ चेक नाक्यावर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
शनिवारी सकाळी ६ वाजता ओरोस येथील पेट्रोलपंपावर चोरट्यांनी डल्ला मारून ते पळून गेले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सर्व पोलिस ठाण्यात माहिती देत अलर्ट केले. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. करूळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेल्या व्ही. एम. कांबळे व एस.ए. तांबे यांनी संशयित शालीरीओ ही कार अडवली. दरम्यान पोलिस निरीक्षक अतुल जाधव व फौजफाटा चेक नाक्यावर दाखल झाला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस हवालदार विलास राठोड, एन. एस. खाडे, श्री. पडीलकर, एम. के. राणे, श्री. कांबळे, एस.टी. शिंदे, संदीप राठोड, एस.ए. तांबे, श्री. जायभाय घटनास्थळी दाखल झाले. गाडीतील सर्व आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रोकड व चोरीचे मोबाईल आढळून आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करत आहेत.