नारळी पौर्णिमा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मास्क वाटप
मालवण : मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने गतवर्षी प्रमाणे यंदा देखील मालवण बंदर जेटी येथे कोरोना अटी शर्थीचे पालन करत नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त महिलांसाठीची नारळ लढवणे स्पर्धा रद्द करून सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना संसर्ग साथरोग प्रतिबंध सुरक्षा म्हणून सायंकाळी मास्क वाटप करण्यात आले. गेल्या दीड वर्षा पासून कोविड १९ या कोरोना संसर्गजन्य साथीने जगभरात थैमान घातले असून आपल्या जिल्ह्यात त्याचा प्रसार दिसून आला तो पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली
यंदा मात्र संसर्गजन्य रुग्ण लवकरच बरे होताना दिसून येत असल्याने मंडळाच्या वतीने योग्य काळजी घेउन नियम कटाक्षाने पाळत मास्क वाटप केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून होणारा कार्यक्रम रद्द करून आपण सुरक्षित अंतर ठेवण गरजेचे असल्याने आम्ही प्रशासनाने सांगण्यापूर्वीच आपल्या सर्वांच्या सुरक्षतेसाठी यंदा देखील नारळ लढवणे स्पर्धा रद्द करून सामाजिक संदेश देण्याच्या हेतूने मास्कची गरज काय आहे, हे या मास्क वाटप करत दाखवून देण्याचा एक प्रयत्न आम्ही केला आहे. बंदर जेटी येथे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना विशेषतः महिलांना आम्ही मास्क देऊन सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नारळ लढवणे स्पर्धेच्या वेळी देखील आम्ही अनेक सामाजिक संदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे यंदा ही आपले कर्तव्य म्हणून मास्क वाटप केले आहे, असे मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते मास्क वाटपास सुरवात करण्यात आले. कुणाला मास्क हवे असल्यास 9892055820 या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, बंदर विभाग व नागरीकांचे आभार मानण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे, फेलीस फर्नांडिस (सरचिटणीस) गणेश पाडगावकर (सदस्य), विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, ममता तळगावकर, योगेश्वर कुरले, चारुशीला आचरेकर, कल्पना मेथर, सरदार ताजर, ऍड. अमृता अरविंद मोंडकर आदी उपस्थित होते