वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारला अचानक आग ; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मालवण : येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांच्या कारला शनिवारी मध्यरात्री चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आग लागली. भडकलेली आग विझविण्यात रात्री उशिरा यश आले. मात्र आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबात डॉ. मिठारी यांनी रविवारी सकाळी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
डॉ. मिठारी राहत असलेल्या चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथील निवासस्थानी त्यांनी आपली कार MH 09 EG 1230 ही पार्कींग करून ठेवली होती. शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास फटाक्यांसारखा मोठा आवाज झाला. त्यामुळे डॉ मिठारी यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता. त्यांच्या कारने पेट घेतल्याचे दिसून आले. आरडाओरड केली असता शेजारी राहत असलेले रहिवाशी धावून आले. पाणी व अन्य साधनाचा वापर करून आग विझविण्यात आली. मात्र कारचे इंजिन व अन्य यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत होते.
दरम्यान याप्रकरणी डॉ. मिठारी यांनी रविवारी मालवण पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे. शॉर्ट सर्किटने कारने पेट घेतला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.