तळाशील समुद्रात उतरलेली तरुणी पोलिसांच्या ताब्यात
युवती कोल्हापूर मधील : नातेवाईक मालवणकडे येण्यास रवाना
मालवण : तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात संशयास्पदरित्या उतरलेल्या एका ३३ वर्षीय तरुणीला स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित तरुणी कोल्हापूर येथील असून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली आहे. तिचे नातेवाईक येथे येण्यास रवाना झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी- तळाशील येथील समुद्रात आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान एक तरुणी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. स्थानिक ग्रामस्थांना तिची हालचाल संशयास्पद असल्याचे दिसल्याने त्यांनी तत्काळ त्या तरुणीला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. मालवण पोलिसांना याची माहिती देताच पोलीस कर्मचारी राजू पेडणेकर, विश्वास पाटील, महिला कर्मचारी प्रविणा आचरेकर यांनी घटनास्थळी जात त्या तरुणीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत ती कोल्हापूर येथील असल्याचे समजले. ती कोल्हापूर येथून मालवणात आली. येथून ती रिक्षाने तळाशील येथे गेली. तिच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधत याची माहिती दिली आहे. त्यानुसार तिचे नातेवाईक येथे येण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.