चाकरमान्यांना बाप्पा पावला ! गणेश चतुर्थी निमित्त आ. नितेश राणेंची मोफत “मोदी एक्स्प्रेस” !!
मालवण : कोकणातील घराघरात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी ! या सणानिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल होतात. मात्र या कालावधीत बस आणि रेल्वेची तिकिटं मिळण्यात होणाऱ्या अडचणी आणि खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून होणारी पिळवणूक यामुळे मेटाकुटीला येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना यंदा बाप्पा पावला आहे. कोकण सुपूत्र, खा. नारायण राणेंची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागल्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी मुंबईकर चाकरमान्यांसाठी मोफत “मोदी एक्स्प्रेस” ची घोषणा केली आहे. ७ सप्टेंबरला ही ट्रेन मुंबईतील दादर स्थानकातून १८०० प्रवाशांना घेऊन सावंतवाडी पर्यंत येणार आहे. याबाबतची घोषणा आ. नितेश राणे यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात नामदार नारायण राणे याना मानाचे स्थान देत केंद्रीय उद्योगमंत्रीपदी संधी देत कोकणला आशीर्वाद दिला. याचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईस्थित आपल्या समस्त कोकणी बांधवांसाठी आमदार नितेश राणे यांनी स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेनची घोषणा केली आहे. गणेशचतुर्थीमध्ये समस्त चाकरमान्यांना आपल्या कोकणातील गावचे वेध लागतात. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्याच लाटेमुळे अनेक गणेशभक्तांना आपल्या गावी येणे शक्य झाले नाही. काहींच्या घरी तर गणेशमूर्तीही येऊ शकल्या नाही. यावर्षी सिंधुदुर्गात कोरोना आटोक्यात आहे. त्यामुळे चाकरमानी मोठया संख्येने गणेशचतुर्थीला सिंधुदुर्गात आपल्या घरी येण्यासाठी आतुररलेले आहेत. मात्र गावी येण्यासाठी काहींना वाहनांची सोय उपलब्ध होत नाही. वाहतुक सुविधा असलीच तर तिकीट बुकिंग साठी चढ्या भावाने हजारो रुपये मोजावे लागतात. आधीच कोरोनामुळे कामधंदा बुडालेला चाकरमानी गावी गणपतीला येण्याची तीव्र इच्छा असूनही अव्वाच्या सव्वा असणाऱ्या वाहतूक खर्चामुळे मेटाकुटीला येतो. या अवस्थेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी सर्वसामान्य गणेशभक्तांचा विचार करून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ही ट्रेन धावणार असून एकूण १८०० गणेशभक्तांना मोफत प्रवास या ट्रेनने करता येणार आहे. प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना एक वेळ भोजनाची मोफत सोय देखील करण्यात आली आहे. ७ सप्टेंबरला दादरहून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून ही ट्रेन सुटणार आहे. आपल्या सीट रिझर्व्ह करण्यासाठी २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत कणकवली भाजपा मंडल तालुकाध्यक्ष संतोष कानडे मोबा. ९४२२३८१९९६, मिलिंद मेस्त्री मोबा. ९४२०६५४५६५, वैभववाडी भाजपा मंडल तालुकाध्यक्ष नासिर काझी मोबा. ९४२२३९२८५५, देवगड भाजपा मंडल तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली मोबा. ७६२०९४७६७६, संतोष किंजवडेकर मोबा. ८९७५८०२७४८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे. ऐन गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस ट्रेनमुळे कोकणात गावी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.