अनधिकृत वाळू व्यावसायिकांत खळबळ …

वाळू चोरी प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल; सहा जण अटकेत

महसूल – पोलिसांची काळसे बागवाडीत पोलिसांची संयुक्त कारवाई : ग्रामस्थांची तक्रार

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण तालुक्यातील काळसे येथील कर्ली नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा केल्या प्रकरणी ४० ते ५० जणांवर पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. यातील सहा जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. होड्यांच्या सहाय्याने शासकीय क्षेत्रातील वाळूची चोरीचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याबाबत काळसे बागवाडीमधील ग्रामस्थांनी तक्रार केली होती.

मालवण तालुक्यातील नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन होत आहे. मात्र महसूल विभागाकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काळसे बागवाडीमध्ये देखील अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याने ग्रामस्थांनी महसूल आणि पोलीस विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, हेड कॉन्स्टे. आर. बी. पाटील, रुक्मांगद मुंडे, सुहास पांचाळ यांच्यासह नायब तहसीलदार आनंद मालवणकर, मंडळ निरीक्षक शिंगारे, कोतवाल स्वप्नील पालकर आदींच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी काळसे बागवाडीत अनधिकृत वाळू उत्खनन केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. २१ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता आणि २८ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संबंधितांकडून वाळू चोरीचा गुन्हा घडला होता. याप्रकरणी आरोपी सुरेश सुनील कोरगावकर (२४, रा. काळसे बागवाडी) यांच्यासह ४० ते ५० परप्रांतीय कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुरेश कोरगावकर याला मंगळवारीच ताब्यात घेण्यात आले होते. तर बुधवारी आणखी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यामध्ये उदय सुधाकर नार्वेकर (४५), विनोद गोपाळ नार्वेकर (५१), जयवंत मधुकर खोत (५४), शाहु वाघु वरक (४२), आणि सखाराम वामन आचरेकर (४२, सर्व रा. काळसे ता. मालवण) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!