महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम; एकाच दिवसात तब्बल ११ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम राज्याने आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. 

दिवसाला १० लाखापेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे आज महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्यावतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सायंकाळी सात वाजेपर्यंत ५ हजार २०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी वर्तविली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार आज सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती. त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या आदल्या दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला होता. आजच्या सर्वोच्च संख्येने झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला गेल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!