“त्यांच्या” अखेरच्या प्रवासातही दुर्गंधीची साथ ; सत्ताधारी लक्ष देणार का ?
कुणाल मांजरेकर
मालवण : येथील नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील देऊळवाडा येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्य आणि स्वच्छतेवर लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या मालवण नगरपालिकेच्या स्मशानभूमीची दुरावस्था ही मालवण नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची साक्ष देणारी असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केला आहे. स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराकडून याठिकाणी कोणतीही स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुर्दैवाने मृत व्यक्तींना त्यांच्या अखेरच्या प्रवासात कचरा व दुर्गंधीच्या साथीने निरोप देण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी श्री. लुडबे यांनी केली आहे.
मालवण शहरातील प्रभाग सात मध्ये असलेल्या देऊळवाडा येथील स्मशानभूमीच्या कचरा व घाणीमुळे झालेल्या दुरावस्थे बाबत नगरसेवक आप्पा लुडबे यांनी नगरपालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. मालवण शहरातील देऊळवाडा येथील स्मशानभूमीत असलेला कचरा व घाणीचे साम्राज्य हे शहरातील स्मशानभूमीचे प्रतिनिधीक रूप आहे. शहरातील बहुतांश स्मशानभूमीची अवस्था ही अशीच आहे. रॉकगार्डन व स्मशानभूमींच्या स्वच्छता व देखभालीसाठी ठेकेदार नेमण्यात आले आहे. मात्र या ठेकेदारांकडून देऊळवाडा स्मशानभूमीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या स्मशानभूमीत झाडी झुडपे वाढलेली असून कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे स्मशानभूमीची बकाल अवस्था झाली आहे. अशा स्थितीतच स्थानिक नागरिकांना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. यामुळे नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदारांकडून दिलेल्या ठेक्याची कामे चोखपणे करून घेणे आवश्यक असताना प्रशासनाचा कोणताही वचक ठेकेदारांवर नाही. प्रशासनाने स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केली आहे.