रक्तदान शिबिराच्या प्रतिसादातून कै. डी. बी. ढोलम यांच्या कार्याची प्रचिती
तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन ; उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक
शिबिरात २२१ जणांचे रक्तदान ; १०० हून अधिक नवीन रक्तदाते ; सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण
कुणाल मांजरेकर
मालवण : रक्तदान हे समाजसेवेचं एक मोठं काम आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळते. कोणाला काहीतरी देणं ही आजच्या घडीला खूप मोठी गोष्ट आहे. वराड – कुसरवे रक्तदाते ग्रूपकडून रक्तदान शिबीरांचे सातत्य अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. रक्तदान शिबीरातही तरुण तरुणींचा स्वतःच्या मर्जीने उत्स्फूर्त आणि अखंड सहभाग हे या भागाचे वैशिष्ट्य आज दिसून आले. एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदानासाठी तरुण तरुणी रक्तदान करतात, हे आयोजकांचं फार मोठ यश आहे. कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या कार्याची अनुभूती या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून आल्याचं प्रतिपादन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी वराड कावळेवाडी येथे आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. यावेळी मतदार नोंदणी विशेष मोहीमेबाबत देखील त्यांनी नवतरुण मतदारांना आवाहन केलं. मतदार यादीत नावनोंदणीची अंतीम तारीख ३० नोव्हेंबर असून जास्तीत जास्त तरुण तरुणींनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या रक्तदान शिबिरात तब्बल २२१ जणांनी रक्तदान केले. यामध्ये १०० हुन अधिक नवीन रक्तदात्यांचा समावेश होता. तर ५० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या चार जणांनी या शिबिरात सहभाग घेतला. तरुणांसोबत तरुणींचाही रक्तदानासाठी मोठा सहभाग हे या रक्तदान शिबीराचे वैशिष्ट्य ठरले.
सहकार महर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वराड कावळेवाडी येथे कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग, वराड – कुसरवे रक्तदाते ग्रूप, आभाळमाया व्हाट्सएप ग्रूप आणि जी. एस. फिटनेस सेंटर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, वाहतूक शाखा सिंधुदुर्ग पोलिस निरीक्षक अमित यादव, सिंधुदुर्ग बॅंक संचालक व्हिक्टर डान्टस , जि. प. सदस्य संतोष साटविलकर, देवेन उर्फ पप्पू ढोलम, पं. स. सदस्य विनोद आळवे, कट्टा गुरामनगरी तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल नाईक, सौ. स्मिता नाईक, स्टेट बॅंक शाखा कट्टाचे शाखाधिकारी कौशिक गावडे, डॉ. प्रथमेश वालावलकर, डॉ. जी. आर सावंत, डॉ. सोनाली पावसकर , वराड उपसरपंच केशव उर्फ आप्पा भिसे, प्रविण मिठबावकर, रोहित डगरे, जिल्हा बॅंक अधिकारी देवानंद लोकेगावकर, बाबा गावडे, रामदास रासम , सिंधुदुर्ग बॅंक शाखा कट्टाचे शाखाधिकारी दिलीप चव्हाण, मंडळ अधिकारी उमेश राठोड, लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑ. सोसायटी कट्टाचे शाखाव्यवस्थापक आनंद प्रभुवालावलकर, वराड हायस्कूल मुख्याध्यापक टी. के. पाटील, ग्रामपंचायत सदस्य उमेश हिर्लेकर, दादा रावले, पेंडूर उपसरपंच विवेक जबडे, केंद्रप्रमुख आनंद घुगे, शिक्षक समिती अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, चंद्रकांत बाईत, सचिन धुरी, विष्णू लाड, बाबू टेंबुलकर, किरण रावले, समीर रावले, बबन पांचाळ, शेखर पेणकर, विकास म्हाडगुत, विनय मठकर, सागर मालवदे, राकेश डगरे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. प्रथमेश वालावलकर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करून त्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. तसेच ५० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या चार रक्तदात्यांचाही सत्कार करण्यात आला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पुरक भेट म्हणून चाफ्याचे झाड भेट देण्यात आले. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑ. सोसायटी शाखा कट्टा, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग, एस. एस. पी. एम. मेडीकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल रक्तपेढी पडवे, अमित आर्ट्स कट्टा, आभाळ माया ग्रूप यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. प्रदिप मिठबावकर आणि जयेंद्र परब यांनी केले.