“ओमीक्रॉन” वर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “ॲक्शन” मोड मध्ये !

लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील ; ठाकरेंचे आवाहन

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी दुरदृश्यप्रणालीने संवाद

कुणाल मांजरेकर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना अलर्ट दिला असून या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्यात हे संकट फोफाऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “ॲक्शन” मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची दुरदृश्यप्रणालीने संवाद साधला. यावेळी ओमीक्रॉन संकटावर खबरदारी म्हणून तातडीच्या उपाययोजना सुरु करत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची कठोर स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करावं अशी सूचना केंद्राने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागण्याचे त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील. विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!