भाजपला धक्का ; अशोक नांदोसकर पत्नीसह शिवसेनेत !
आ. वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश
कुणाल मांजरेकर
मालवण : कट्टा- नांदोस पंचक्रोशीत शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. नांदोस गावच्या सरपंच आरती नांदोस्कर व त्यांचे पती माजी सरपंच अशोक नांदोस्कर यांनी गुरुवारी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नांदोस्कर कुटुंबीय शिवसेनेत स्वगृही परतल्याने पुष्पगुच्छ देऊन शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. मालवण तालुका तसेच नांदोस गावात शिवसेनेच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामे लक्षात घेता खऱ्या अर्थाने शिवसेनाच विकास करू शकते त्यामुळे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांच्यावर विश्वास ठेऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे नांदोस्कर यांनी सांगत यापुढे सर्वांना सोबत घेऊन निवडणूकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षात प्रवेश कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवला जाईल, सर्वानी एकत्रित रित्या पक्ष वाढीचे काम करावे. तसेच नांदोस गावच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल असे सांगितले. सतीश सावंत म्हणाले, नांदोस्कर कुटुंबीय शिवसेनेत स्वगृही परतल्याने नांदोस येथे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकांमध्ये सर्वांनी पूर्ण ताकदीने काम करून सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, विभागप्रमुख विजय पालव, डॉ.जी.आर सावंत, माजी सभापती बाळ महाभोज, देवा रेवडेकर, बाबू टेंबुलकर, पराग नार्वेकर, किरण प्रभू, निलेश पुजारे, बंडू ठाकूर आदी शिवसैनिक उपस्थित होते.