कराड मधून बेपत्ता झालेल्या विवाहित तरुण – तरुणीचा पोलिसांकडून मालवणात शोध सुरू

१७ नोव्हेंबरचे मोबाईल लोकेशन मालवणात ; तरुण – तरुणी एकत्र बेपत्ता झाल्याचा नातेवाईकांचा संशय

कुणाल मांजरेकर

कराड येथून १६ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास बेपत्ता झालेल्या तरुण – तरुणीचा पोलिसांकडून मालवणात शोध घेण्यात येत आहे. योगेश बाळासाहेब भिसे (वय २६, रा. साई समर्थ प्लाझा, मंगळवार पेठ कराड) असे या तरुणाचे नाव असून तो विवाहित आहे. तर कु. रश्मी भरत खांडेकर (वय २२, रा. मलकापूर कराड) ही युवती देखील त्याच दरम्यान बेपत्ता झाली असून हे दोघेही जण एकत्र असल्याचा संशय संबंधितांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. १७ नोव्हेंबर रोजी त्यांचे मोबाईल लोकेशन मालवणात मिळून आल्याने या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश बाळासाहेब भिसे या २६ वर्षीय तरुणाचा २० जून २०१९ रोजी आपली शालेय मैत्रीण सौ. सारिका योगेश भिसे हिच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. मात्र हा विवाह घरच्याना मान्य नसल्याने ते विभक्त राहत होते. परंतु ३१ मे २०२१ रोजी दोन्ही बाजूंनी संमती मिळाल्यानंतर या दोघांचे कराड येथे पुन्हा एकदा लग्न लावण्यात आले. लग्नानंतर सौ. सारिका ही पाटण सातारा येथील आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आली. २२ एप्रिल रोजी या दांपत्याला पुत्र प्राप्ति झाल्यानंतर सौ. सारिका माहेरी राहून अधून मधून सासरी येत जात असे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री तिला नवरा योगेश भिसे याचा फोन आला. पण हा फोन कट झाल्याने तिने वारंवार नवऱ्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता हा फोन लागला नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी ती माहेरहून सासरी कराडला आली असता १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा योगेश भिसे कोणासही न सांगता घरातून निघून गेल्याचे समजले. त्याच्या अन्य मित्रपरिवाराकडे विचारणा केल्यानंतरही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने सौ. सारिका हिने कराड पोलीस ठाण्यात योगेश बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे.

मलकापूर येथून युवती बेपत्ता

मंगळवार पेठ येथून योगेश भिसे हा विवाहित तरुण बेपत्ता झालेला असताना याचवेळी मलकापूर कराड येथून कु. रश्मी भरत खांडेकर ही २२ वर्षीय युवती देखील बेपत्ता झाली आहे. ही युवती मलकापूर येथे आई वडिलांसमवेत राहते. १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खांडेकर कुटुंबीय जेवण करून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झोपी गेले. मुलगी रश्मी ही स्वतःच्या बेडरूम मध्ये झोपण्यास गेली होती. मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास श्री. खांडेकर हे झोपेतून उठले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी मुलीच्या बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता ती त्या ठिकाणी आढळली नाही. तसेच श्री. खांडेकर हे वापरत असलेली एम. एच. ४६ – बीई- ९५४९ ही हुंडाई क्रेटा गाडी देखील या ठिकाणी दिसून आली नाही. त्यामुळे भरत खांडेकर यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दिली आहे.

तरुण – तरुणी एकत्र असल्याचा नातेवाईकांना संशय ; मालवणात लोकेशन

कराड येथून १६ नोव्हेंबरला एकाच रात्रीत बेपत्ता झालेला योगेश भिसे आणि रश्मी खांडेकर ही तरुण – तरुणी एकत्र असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. १७ नोव्हेंबर रोजी युवतीचे लोकेशन मालवण मिळून आल्याने कराड पोलीस ठाण्यातून याबाबत मालवण पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा शोध सुरू असून ही तरुण – तरुणी अथवा क्रेटा गाडी दिसून आल्यास तात्काळ मालवण पोलीस ठाणे ( ०२३६५ – २५३५३३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर आणि हेड कॉन्स्टे. डी. व्ही. जानकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!