कंत्राटी वीज कामगारांचीच दिवाळी “अंधारात” ; अशोक सावंत आक्रमक
मानधन रखडले ; तात्काळ मानधन जमा करण्याची अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही
पगार न मिळाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा अशोक सावंत यांचा इशारा
कुणाल मांजरेकर
दिवाळी झाली तरी अद्यापही महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे मानधन अद्याप झालेले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महावितरण कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी कुडाळ येथे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. उद्यापर्यंत पगार न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा श्री. सावंत यांनी दिला. त्यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी काम बंद न करण्याची विनंती करून उद्या तातडीने मानधन जमा करण्याची सूचना ठेकेदाराला दिली.
महावितरणच्या कंत्राटी कामगारांची बैठक कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेचे नेते अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा प्रतिनिधी संदीप बांदेकर आनंद लाड, सर्वेश राऊळ, संजय गोवेकर, योगराज यादव, बाबाजी गावडे, चेतन चव्हाण, विनय येरम यांच्यासह अन्य कामगार उपस्थित होते. यावेळी ठेकेदाराने दिवाळीपूर्वी मानधन जमा करण्याची ग्वाही दिलेली असतानाही अद्यापपर्यंत पगार न झाल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली. यावर अशोक सावंत यांनी आपण स्वतः अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. यानंतर श्री. सावंत यांनी अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय गाठले. यावेळी श्री. सावंत यांनी पगार न मिळाल्याने कंत्राटी कामगार कामबंद आंदोलन करण्याचा मानसिकतेत असल्याचे सांगितले. यावर अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी एक दिवस थांबण्याची विनंती करून कोणत्याही परिस्थितीत उद्यापर्यंत कामगारांचे मानधन जमा होईल, अशी ग्वाही देत ठेकेदाराला तडक फोन करून कोणत्याही परिस्थितीत उद्या कामगारांचे वेतन जमा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उद्यापर्यंत कामगारांचे मानधन जमा न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा श्री. सावंत यांनी दिला आहे.
विद्युतसेवक नियुक्ती करताना कंत्राटी कामगारांवर अन्याय नको
वीज वितरण कंपनी नवीन १०० विद्युत सेवक नियुक्त करणार आहे. मात्र परजिल्ह्यातून येणारे हे कर्मचारी तीन वर्षे होताच या जिल्ह्यातून बदली करून घेतात. यापूर्वी जिल्ह्यात आलेल्या १०० कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी आज जिल्ह्यात नाही. त्यामुळे हे कर्मचारी जिल्ह्यात आणताना कंत्राटी कामगारांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना अशोक सावंत यांनी केली. यावर एकही कंत्राटी कर्मचारी कमी केला जाणार नाही, असे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी सांगितले.