विनोद सांडव : संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व !

….. कुणाल मांजरेकर

माझे वडील राजकीय नेते म्हणून मी युवा नेता … माझे काका, मामा, काकी, आत्या नेते म्हणूनही मी युवा नेता … असे युवा नेते ठिकठिकाणी आढळतात… पण परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःच्या हिंमतीवर राजकारणात स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तीच भविष्यात इतिहास घडवतात. यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपूत्र तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव ! २००५ मध्ये “शिवसेना” ही चार अक्षरे उच्चारण म्हणजे पाप समजलं जायचं. अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी चौके पंचक्रोशीत शिवसेनेचा भगवा अभिमानाने खांद्यावर घेऊन भगव्यासाठी स्वतःचं रक्त सांडवणारं नेतृत्व म्हणजे विनोद सांडव… काळ बदलला तसा वेळ बदलला… पक्षाचे विचारही बदलले… त्यातून प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून नावारूपाला आलेल्या राज ठाकरेंच्या मनसेची कास धरलेल्या विनोद सांडव यांचा आज १८ नोव्हेंबर २०२१ रोजी ४४ वा वाढदिवस ! यानिमित्ताने त्यांच्या धगधगत्या जीवन प्रवासाचा घेतलेला हा आढावा …

विनोद सांडव यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९७७ रोजी सोनवडेपार ता. कुडाळ येथे झाला. सांडव यांचे वडील शेतकरी कुटुंबातील असल्याने विनोद यांच्या जन्मानंतर त्यांनी चौके येथील मूळ घरी येऊन स्वतःची शेती सुरू केली. शिक्षण घेत असतानाच शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी विनोद सांडव यांचा पाया रचला जात होता. पण त्यांच्या अंगातील त्या सळसळत्या रक्ताला वाट मिळत नव्हती. आणि अखेर तो दिवस आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना म्हणजे नारायण राणे हे समीकरण होते. मात्र २००५ मध्ये राणेंचे शिवसेनेत बिनसल्याने राणेंनी काँग्रेसची वाट धरली. त्यामुळे एका क्षणात कोकणात नंबर वन वर असलेल्या शिवसेनेला घरघर लागली. शिवसेनेकडे नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची वानवा जाणवू लागली. शिवसेनेचा ध्वज हाती घेण्यासाठी एकही व्यक्ती सापडत नव्हता. राणेंवरील कथित अन्यायाने पेटून उठलेल्या राणे समर्थकांनी शिवसेनेचा भगवा ध्वज वर्ज्य केला. त्यामुळे अगदी मुंबईतून सिंधुदुर्गात येणारे शिवसेना नेते देखील स्वतःच्या गाडीवरील भगवा ध्वज काढून जिल्हयात प्रवेश करीत. अशावेळी मालवण – कणकवली हा तर नारायण राणेंचा विधानसभा मतदार संघ. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही शिवसेनेत राहू शकत नव्हते. अशावेळी परशुराम उपरकर, भाई गोवेकर यांच्या सारखे मोजके नेते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. गावागावात संघटना उभारणीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेची ही अवस्था पाहून विनोद सांडव हा तरुण पुढे आला. आपल्या काही मित्रांना घेऊन विनोद सांडव यांनी चौके गावात स्वखर्चाने शिवसेनेची शाखा निर्माण केली. तसेच युवकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी चौके गावात त्यावेळी ११ हजार रुपये बक्षिसाची पहिली क्रिकेट स्पर्धा त्यांनी भरवली. त्याकाळात संघर्ष म्हणजे विनोद सांडव असं समीकरणच बनलं होतं. आमडोस गावात २००६ मध्ये पहिली पोटनिवडणुक लढवून तत्कालीन राणे समर्थकांना आव्हान निर्माण करण्याचा त्यानी प्रयत्न केला. या कारणातून दुसऱ्याच दिवशी रात्री १२ वाजता विनोद सांडव आणि त्यांचे सहकारी सुलोचन आंबेरकर, गुरू गवस, राजेश परब यांना २५ ते ३० जणांनी रात्री १२ वाजता आंबेरीच्या रस्त्यावर मारहाण केली. ज्यावेळी शिवसेना शब्द उच्चारणे पाप होते, त्यावेळी परशुराम उपरकर आणि भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली विनोद सांडव यांनी शिवसेनेचा झंझावात चौके पंचक्रोशीत निर्माण केला. त्याचीच परिणीती म्हणून २००७ च्या मालवण पंचायत समिती निवडणूकीत देवली पं. स. मतदार संघातून गोपाळ चौकेकर हे शिवसेनेचे पहिले पंचायत समिती सदस्य निवडून आले. राणेंचा जिल्ह्यात झंझावात सुरू असताना विनोद सांडव यांनी राणेंना दिलेला तो पहिला हादरा होता. याची दखल खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी घेऊन या विजयाचे कौतुक केले होते.

२००७ मध्ये वैभव नाईक शिवसेनेत दाखल झाले. यावेळी वैभव नाईक यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विनोद सांडव यांनी शिवसेनेचं काम केलं. २००९ च्या वैभव नाईक यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या रात्री नांदरुखमध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी शिवसेना सत्तेत नव्हती. त्यामुळे विनोद सांडव यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. खंडणी सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले. तरीही ते डगमगले नाहीत. शिवसेनेचे कार्य आणि भगव्याची सेवा त्यांनी विनाखंडितपणे सुरू ठेवली. या कालावधीत विभागप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

बाळासाहेबांच्या निधनानंतर परशुराम उपरकर यांनी शिवसेना सोडून मनसे मध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेने प्रेरित होऊन विनोद सांडव हे देखील मनसेमध्ये दाखल झाले. आज मनसेचे मालवण तालुकाप्रमुख पद ते सांभाळत आहेत. या शिवाय चौके पंचक्रोशीत एक उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. वडिलोपार्जित शेती सोबतच त्यांनी हॉटेल, चिरे- खडी व्यवसायात स्वतःच नाव निर्माण केलं आहे. पत्नी, तीन मुले, भाऊ असा त्यांचा परिवार आहे. व्यवसायात कुटुंबाची वेळोवेळी आपणाला साथ मिळत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांचा वाढदिवस आज १८ नोव्हेंबरला साजरा होतोय. यानिमित्ताने त्यांच्या भविष्यातील वाटचालीला “कोकण मिरर” परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा !!!

आज सामाजिक कार्याबरोबरच तिरंगी बारीची मेजवानी !

विनोद सांडव यांनी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांबरोबरच तिरंगी बारीची मेजवानी ठेवली आहे. संदीप लोके, गुंडू सावंत आणि दिनेश वागदेकर यांच्यात हा तिरंगी बारीचा सामना होणार आहे. त्याचप्रमाणे मागील आठ दिवसांपासून मालवण आगारात काम बंद आंदोलनास बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचे जेवण विनोद सांडव यांच्या वतीने दिले जाणार आहे. एसटी कर्मचारी बांधव हे आमचे असून त्यांच्या कठीण काळात त्यांना थोडीफार मदत म्हणून आपण हा उपक्रम हाती घेतल्याचे श्री. सांडव म्हणाले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!