मालवणमधील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; अश्विन कुमार, डिंपल गोवडा ठरले वेगवान जलतरणपटू
चिवला बीच येथे १० कि. मी. व अन्य गटातील राज्यस्तरीय सागरी जलतण स्पर्धा : राज्यभरातील स्पर्धकांचा मोठा सहभाग
मालवण : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने आणि सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित केलेल्या १४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील स्पर्धक मोठया संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्पर्धेतील सर्वाधिक मोठया १० किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात ठाणे येथील अश्विन कुमार, तर महिलांच्या गटात बेळगाव येथील डिंपल गोवडा यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळवला.
दरम्यान, ५०० मीटर मुलांच्या गटात बेळगाव येथील हर्षवर्धन करलेकर व मुलींच्या गटात दुर्वा कुरणकर यांनी वेगवान जलतरणपटू चषक मिळवला. तर फिन स्विमिंग 1 किलोमीटर ध्रुव धामणे (नाशिक), आरनी भंडारी (मुंबई), 2 किलोमीटर आलोक जाधव (नाशिक), इयाना पटेल (नाशिक) हे वेगवान जलतरणपटू ठरले.
शनिवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १० किमी., १ व २ किमी. फिन्स स्विमिन्ग, आणि दिव्यांग व ५०० मीटर मुले सहभाग असलेल्या विविध गटात स्पर्धा संपन्न झाली. यावेळी राज्य संघटना अध्यक्ष आनंद माने, राज्य सेक्रेटरी राजेंद्र पालकर, सिंधुदुर्ग जिल्हा संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब, उपाध्यक्ष बाबा परब, उपाध्यक्ष निल लब्दे, किशोर पालकर, अरुण जगताप, युसूफ चुडेसरा, शिवछत्रपती राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागरकन्या रुपाली रेपाळे, अर्जुन अवार्ड प्राप्त पॅरास्विमर सुयश जाधव, द्रोणाचार्य अवार्ड प्राप्त डॉ. तपन पाने, भरत सैनी, डॉ. राहुल पंतवालावलकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, बाबला पिंटो, सरोज परब, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, बाबू आंगणे यांसह अन्य मान्यवर स्पर्धक, प्रशिक्षक व पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
२१ रोजी सकाळी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब व अन्य मान्यवरांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करुन १० किमी तसेच अन्य गटातील स्पर्धेचा शुभारंभ झाला. स्पर्धा उदघाटन वेळी डॉ. दीपक परब यांनी खास मालवणी शैलीत गाऱ्हाणे घातले. शनिवारी सर्व गटातील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी 22 रोजी सकाळी 5 किमी तसेच अन्य स्पर्धेची सुरुवात होईल. दुपारी 1 वाजल्यापासून स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ होईल. असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
स्पर्धकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य
चिवला बीच येथील स्पर्धेदरम्यान स्पर्धा प्रमुख राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात लाईफ गार्ड, लाईफ बोट यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धकावर लक्ष ठेवला जातो. किनाऱ्यावर ऍम्ब्युलन्स, डॉक्टर तैनात असतात. तसेच आयोजक टीमचेही किनाऱ्यावरून स्पर्धकांवर लक्ष असते. या सर्वातून स्पर्धा यशस्वी ठरते.
सागरी जलतरण स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता : आनंद माने
गेली १४ वर्षे मालवण चिवला बीच येथे दरवर्षी वाढत्या प्रतिसादात सागरी जलतरण स्पर्धा होते. स्थानिक नागरिक, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक यां सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग स्पर्धा यशस्वी होते. राज्य तसेच देश पातळीवरील अनेक स्पर्धक यात सहभागी होतात. राज्य सेक्रेटरी राजेंद्र पालकर यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. सागरी जलतरण स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ही मान्यता मिळाली आहे. हे पाहता भविष्यात यां स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढेल. असा विश्वास राज्य संघटना अध्यक्ष आनंद माने यांनी व्यक्त करताना सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.